Headlines

हवामान मापन केंद्रांतील त्रुटी तातडीने दूर करा…

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश:फळपीक विमा नुकसानभरपाईतील त्रुटींचा सखोल आढावा; हवामान मापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर..

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०१-: जिल्ह्यातील नादुरुस्त हवामान मापन केंद्रे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावीत. हवामान मापनातील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून नोंदविण्यात येणाऱ्या माहितीची काटेकोर पडताळणी करावी. हवामान मापनातील चुकीच्या नोंदींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

जिल्ह्यातील फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई वितरणातील त्रुटी, हवामान मापन केंद्रांची सद्यस्थिती आणि त्यातून निर्माण झालेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर कृषि विभाग, स्कायमेट कंपनी आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील तारिणी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कृषी उपसंचालक श्री. बडे, स्कायमेटचे व्यवस्थापक संजय मोरे, कृषी विमा कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक अतुल झणके तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, फळपीक विमा योजनेचा उद्देश संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचा आहे. मात्र, हवामान मापन केंद्रांतील बिघाड, तांत्रिक अडचणी किंवा चुकीच्या माहितीमुळे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रत्येक हवामान मापन केंद्र कार्यरत राहील, त्यातून अचूक माहिती मिळेल आणि त्या माहितीच्या आधारे विमा दावे निकाली निघतील, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे.

बैठकीत हवामान मापन केंद्रांच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नादुरुस्त केंद्रांमुळे विमा दाव्यांवर झालेला परिणाम, त्यामागील तांत्रिक कारणे तसेच ती दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. हवामान मापनातील प्रत्येक नोंद विश्वासार्ह व अचूक राहण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी त्यांनी नागरी सुविधा केंद्रांचे आयडी बंद झाल्यामुळे फळपीक विमा योजनेचा लाभ मिळू न शकलेल्या शेतकरी व बागायतदारांच्या समस्येकडेही विशेष लक्ष वेधले. विमा कंपन्यांनी व संबंधित यंत्रणांनी अशा सर्व प्रकरणांची तपासणी करून त्रुटी दूर कराव्यात आणि पात्र लाभार्थ्यांना कोणताही विलंब न करता नुकसानभरपाईचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी हवामान मापन केंद्रांची सद्यस्थिती, तांत्रिक अडचणी, विमा दाव्यांच्या प्रक्रियेतील त्रुटी तसेच त्यावरील उपाययोजनांची माहिती सादर केली. पालकमंत्र्यांनी प्रत्येक मुद्द्याचा सविस्तर आढावा घेत शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
०००००

You cannot copy content of this page