कायमस्वरूपी वायरमन नियुक्त करा: सावित्री पालेकर यांची मागणी..
⚡आंबोली, ता.०१-: महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे आंबोलीसह गेळे आणि चौकूळ परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून त्याचा मोठा फटका पर्यटन व्यवसायाला बसत असल्याचा आरोप आंबोलीच्या माजी सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री पालेकर यांनी केला आहे. मान्सून पर्यटन हंगाम सुरू असताना तासनतास वीज नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, त्वरित कायमस्वरूपी वायरमन नियुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आंबोली येथील महावितरणच्या उपकेंद्राला कोल्हापूर जिल्ह्यातून ३३ केव्ही वीजवाहिनी येते. येथून पुढे ११ केव्ही वीजवाहिनीद्वारे आंबोली, गेळे आणि चौकूळ या गावांना वीजपुरवठा केला जातो. त्यानंतर विविध ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून घरे, वाड्या तसेच हॉटेल व्यावसायिकांना वीजपुरवठा केला जातो.
या तिन्ही गावांमध्ये सध्या कंत्राटी पद्धतीवर चार कर्मचारी कार्यरत असून ते वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यास किंवा वीजवाहिनी तुटल्यास दुरुस्तीपूर्वी आवश्यक असलेले परमिट उपकेंद्रातून घ्यावे लागते. हे परमिट कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्याचा अधिकार नसल्याने, तासाभरात पूर्ण होणारी कामे अनेकदा एक ते दोन दिवस प्रलंबित राहतात. परिणामी नागरिक आणि व्यावसायिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
सध्या आंबोलीमध्ये मान्सून पर्यटनाचा हंगाम सुरू असून महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि इतर राज्यांतून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येथे दाखल होत आहेत. मात्र वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेक पर्यटक हॉटेलमधील आरक्षणे रद्द करत आहेत, तर वास्तव्यास असलेले पर्यटकही तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. तासनतास वीज नसल्याने हॉटेलमधील अन्नपदार्थ खराब होत असून व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान वाढत आहे.
आंबोलीतील हॉटेल व्यवसाय स्थानिक व्यावसायिकांनी स्वतःच्या कष्टातून उभा केला आहे. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हा व्यवसाय संकटात सापडत असल्याचा आरोप सौ. सावित्री पालेकर यांनी केला. आंबोली, गेळे आणि चौकूळ येथे कायमस्वरूपी वायरमन नियुक्त करून त्यांना ट्रान्सफॉर्मर तसेच ११ केव्ही वीजवाहिनीवरील दुरुस्तीसाठी आवश्यक परमिट देण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने परिसरातील नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक संतप्त झाले आहेत. लवकरात लवकर प्रश्न न सुटल्यास महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल. तसेच हा विषय ग्रामसभेत उपस्थित करून व्यावसायिकांचे झालेले नुकसान भरून देण्याची मागणीही महावितरणकडे करण्यात येणार असल्याचे सौ. पालेकर यांनी सांगितले.
