Headlines

आंबोलीत उद्या मान्सुन मॅरेथॉन स्पर्धा..

विशाल परब यांच्या हस्ते होणार शुभारंभ; राज्यभरातून सुमारे हजार धावपटूंचा सहभाग अपेक्षित..

⚡आंबोली, ता.०१-: सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली-सांगेली व सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित ‘आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६’ स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात या भव्य स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

स्पर्धेचा शुभारंभ महाराष्ट्र भाजप युवानेते तथा विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. १८ कि.मी., १० कि.मी. आणि ५ कि.मी. अशा तीन गटांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या मॅरेथॉनमध्ये राज्यभरातून सुमारे एक हजार स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता असून, त्यानिमित्ताने आंबोली येथे मोठ्या संख्येने पर्यटक व क्रीडाप्रेमी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी विशाल परब यांनी सांगितले की, आंबोलीसारख्या निसर्गरम्य पर्यटनस्थळाला अशा क्रीडा उपक्रमांमुळे अधिक प्रसिद्धी मिळेल. पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच नागरिकांनी आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, नियमित व्यायाम व धावण्याची सवय लावावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
विशेष म्हणजे विशाल परब व सौ. वेदिका परब हे देखील या मॅरेथॉनमध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आंबोलीच्या हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आलेली ही मान्सुन मॅरेथॉन क्रीडा, पर्यटन आणि आरोग्य जनजागृतीला निश्चितच नवी दिशा देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page