मनसेच्या गणेश वाईरकर यांचा सवाल: वर्षभरापूर्वी आशिष शेलार यांनी नाट्यग्रहासाठी निधीची घोषणा केली होती ती हवेत का विरली..?
⚡मालवण ता.२४-:
मालवण मधील मामा वरेरकर नाट्यगृहाचे भयाण वास्तव “आमने सामने” नाटकातील कलाकारांनी मालवणच्या जनतेसमोर मांडल्यावर याची तात्काळ दखल स्थानिक वृत्तपत्र आणि सोशल मीडियावर घेतली गेल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असलेले राजकीय पुढारी एकत्र येऊन आम्ही सक्षम आहोत हे दाखविण्याचे केविलवाणे प्रयत्न करीत आहेत. कलाकारानी नाट्यगृहाचे वास्तव मांडल्यावर सत्ताधाऱ्यांना जाग आली का ? असा प्रश्न मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून उपस्थित केला आहे.
इतके दिवस नाट्यगृहाला लागलेल्या दुरावस्थेचे ग्रहण पहायला सक्षम असलेल्या लोकप्रतिनिधीना खरच वेळ नव्हता का ? वर्षभरापूर्वी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नाट्यगृहासाठी निधीची घोषणा केली होती ती हवेत का विरली याचे उत्तर सत्ताधारी देतील का ? असेही सवाल गणेश वाईरकर यांनी विचारत मालवण हे पर्यटन दृष्ट्या एक महत्वाचे शहर असून फक्त नाट्यगृहच नव्हे तर अनेक प्रश्न शहराला भेडसावत आहेत, असे म्हटले आहे. अनधिकृत फेरीवाले स्वच्छतागृहे बेशिस्त पार्किंग अशा अनेक गोष्टींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आता पुढील ३ वर्षे कोणत्याच निवडणुका सध्या तरी नाहीत त्यामुळे आता मालवणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. याबाबत आमच्या दृष्टीने काही उपाययोजना आहेत त्याबाबत लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे गणेश वाईरकर यांनी सांगितले. तसेच विकासात्मक होत असलेल्या गोष्टींवर आपला बारकाईने लक्ष असेल असेही गणेश वाईरकर यांनी म्हटले आहे.
