Headlines

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण…

बार्टी व एमसीईडी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण कार्यक्रम..

⚡देवगड ता.२४-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी अनिवासी स्वरूपाचा मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या अंतर्गत एक महिना कालावधीचा गारमेंट्स उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम तसेच दोन महिने कालावधीचा सायबर सिक्युरिटी व डाटाबेस रिकव्हरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देऊन त्यांनी स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करावा किंवा रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी सक्षम करणे हा आहे.
प्रशिक्षणादरम्यान संबंधित विषयांचे प्रात्यक्षिकासह तांत्रिक ज्ञान देण्यात येणार असून उद्योजकीय ज्ञानामध्ये उद्योग उभारणीची प्रक्रिया, शासकीय कर्ज व अनुदान योजना, प्रकल्प अहवाल तयार करणे, विक्री कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, उद्योग भेटी तसेच कर कायदे व परवाने (लायसन्स) याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. पात्रतेसाठी उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा, किमान आठवी उत्तीर्ण असावा, गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असावा तसेच स्वयंरोजगार किंवा रोजगार करण्याची तयारी असावी. प्रवेश अर्जासोबत आधार कार्ड, छायाचित्र, जातीचा दाखला, अंतिम सत्राची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला व रहिवासी दाखला सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्गचे प्रकल्प अधिकारी राजेश कांदळगावकर यांच्याशी संपर्क साधावा किंवा एमसीईडीच्या www.mced.co.in/Barti या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कोकण विभागीय अधिकारी डी. यू. थावरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page