बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी: शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर..
⚡सिंधुदुर्ग दि.२४-: जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक असलेल्या आंबा व काजू उत्पादनावर अवकाळी पावसाचे सावट आले असून, अचानक बदललेल्या हवामानामुळे फळधारणेला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. झाडांवर सध्या शिल्लक असलेली फळे गळून पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला तालुक्यातील बागायतदार व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोंडमिसे यांना सविस्तर निवेदन सादर करून परिस्थितीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी पंचायत समिती सभापती जयप्रकाश चमनकर, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, प्रकाश बोवलेकर, श्यामसुंदर राय यांच्यासह इतर प्रतिष्ठित बागायतदार उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बदललेल्या हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. तसेच, २३ तारखेपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांची पीकपाणी नोंद ऑनलाइन झालेली नाही, त्यांची ऑफलाइन नोंद करण्याबाबत तलाठ्यांना तात्काळ आदेश द्यावेत, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने या निवेदनाची दखल घेऊन तातडीची कार्यवाही केल्यास फळबागायतदारांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
