बाळकृष्ण पेडणेकर याने राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत पटकावला नववा क्रमांक…

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडीचा राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू बाळकृष्ण कौस्तुभ पेडणेकर याने लेफ्टनंट कमांडर कै.गोपाळ सुखटणकर यांच्या स्मरणार्थ पणजी, गोवा येथे आयोजित केलेल्या चौदाव्या राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत नववा क्रमांक पटकावला. पणजी, गोवा येथील मुष्टीफंड हायस्कूल पॅरेंट्स-टिचर्स असोसिएशन आणि तिसवाडी तालुका बुदधिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विदयमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गोव्यासोबत इतर राज्यातील दोनशे चोवीस खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. मुक्ताई ॲकेडमीच्या पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर, पुर्वांक कोचरेकर, योगी लेले, चिदानंद रेडकर, लिएण्डर पिंटो, अथांग देसाई, स्वरुप राऊळ, वेदांत डांगी या विदयार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
बाळकृष्णने नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट खेळ करत नऊ राऊंड्समध्ये सात राऊंड्स जिंकून सात गुण केले. तसेच या स्पर्धेत त्याने आपले आंतरराष्ट्रीय रेटिंग चौतीस गुणांनी वाढवले. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत बाळकृष्णने आपला दबदबा कायम ठेवला आहे. बाळकृष्णला असोसिएशनचे अध्यक्ष महेश कांदळकर, उदयोजक प्रशांत रेडकर, आंतरराष्ट्रीय पंच अरविंद म्हामळ, दत्ताराम पिंगे, अग्नि, आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. गेली दहा वर्षे मुक्ताई ॲकेडमीचे शेकडो विदयार्थी सातत्याने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुदधिबळ स्पर्धेत यश मिळवत आहेत. ॲकेडमीचे बहुतांश विदयार्थी आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू आहेत. सर्व विदयार्थ्यांना मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक उत्कर्ष लोमटे यांचे मार्गदर्शन मिळते. सर्व स्तरातुन बाळकृष्ण आणि सर्व विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page