तळवणे-मठवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग…

गावडे कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक, ५ लाखांचे नुकसान, जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी घटनास्थळी जात केली पहाणी….

⚡सावंतवाडी ता.२२-: तळवणे-मठवाडी येथील रहिवासी गोपाळ (रामदास) वसंत गावडे यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत त्यांचे संपूर्ण घर डोळ्यादेखत भस्मसात झाले असून, संसाराची अक्षरशः राख रांगोळी झाली आहे. अचानक लागलेल्या या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून घराचे छप्पर जळून पूर्णपणे कोसळले आहे. घरातील बेड, कपाट आणि इतर फर्निचरसह अंदाजे १ लाख रुपयांची रोकड देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गावडे कुटुंबाचे सुमारे ५ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

​घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गोपाळ गावडे आणि त्यांच्या कुटुंबाला धीर दिला. याबाबत तलाठी अनुजा भास्कर यांनी उद्या सोमवारी नुकसानीचा रितसर पंचनामा करणार असल्याचे श्री. कवठणकर यांना सांगितले आहे. या दुर्दैवी घटनेत गावडे यांचा अख्खा संसार जळून खाक झाल्यामुळे त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. तरी दानशूर व्यक्तींनी ७०६६८०४२३६ या गुगल पे नंबरवर “आर्थिक मदत” करून गावडे कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन श्री. कवठणकर यांनी केले आहे.

​यावेळी उपसरपंच रंजन गावडे, माजी उपसरपंच सुनील सोपटे, निलेश गावडे, शुभम नाईक, सागर गावडे, नामेश गावडे, नितीन गावडे, भूषण गावडे, सुरेंद्र माटकर, पंकज तळवणेकर, प्रदीप गावडे, सूर्यकांत गावडे, अमरेश गावडे, दिलीप गावडे, प्रशांत गावडे, काका गावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page