⚡सावंतवाडी ता.२२-: मिशन क्लीन सावंतवाडी अंतर्गत प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांची व्यापक महा स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे सावंतवाडी शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करत विविध ठिकाणी प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात आली.
या अभियानात सरकारी व खासगी रुग्णालये, शाळा, बसस्थानक, सरकारी कार्यालये, प्रमुख रस्ते व त्यालगतचे परिसर स्वच्छ करण्यात आले. कचरा संकलन, सांडपाणी मार्गांची साफसफाई तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला घाणेरडा कचरा हटविण्यावर विशेष भर देण्यात आला. शहर सुशोभिकरणासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही ही मोहीम महत्त्वाची ठरली.
चार दिवस चाललेल्या या मोहिमेची सांगता संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीदिनी करण्यात आली. शहरातील प्रत्येक प्रभागात ही स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, तसेच स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमाला लाभला. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. “स्वच्छता ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून नागरिकांची सततची जबाबदारी आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी सर्वांनी नियमित सहभाग घ्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले. या महा स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावला असून, पुढील काळातही अशा उपक्रमांचे सातत्य राखण्यात येईल, असा विश्वास नगरपरिषदेच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली मिशन क्लीन सावंतवाडी अंतर्गत महा स्वच्छता मोहीम…
