⚡दोडामार्ग ता.२१-: तालुक्यातील तेरवण परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली असून गुराखी मनोहर रामकृष्ण गवस यांच्या गोठ्यातील सुमारे दहा महिन्यांचे वासरू ठार झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गोठ्याकडून वासराचे जोराचे हंबरणे ऐकू आल्याने गवस यांनी तातडीने तेथे धाव घेतली. मात्र तोपर्यंत दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याच्या नरडीचा घोट घेतला होता. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या वासराचा काही वेळातच मृत्यू झाला, तर बिबट्या अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पसार झाला.
दरम्यान, महाशिवरात्रीच्या दिवशी तेरवण–मेढे मार्गावर ‘ब्लॅक पॅथर’ दिसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आधीपासून सुरू होती. जंगलातील अधिवास कमी होत असल्याने वन्य प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लहान मुले, शेतकरी आणि जनावरे यांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करण्यात आला असून शासनाकडून मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानभरपाई अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
परिसरात वनविभागाने तातडीने गस्त वाढवावी, बिबट्याचा माग काढून योग्य ती उपाययोजना करावी आणि बाधित शेतकऱ्याला तत्काळ व योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
तेरवण येथे बिबट्याचा हल्ला; गोठ्यातील वासरू ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट…
