⚡सावंतवाडी ता.२१-:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी क्रमांक ६ व कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ तसेच ISO (9001:2015) मानांकन प्रदान सोहळा मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
शाळेस कंपाउंड वॉल बांधून सहकार्य करणारे राजू भालेकर, नवनिर्वाचित महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती दिपाली भालेकर, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सुनील करडे, राज्यस्तरीय जिजाऊ माता पुरस्कार प्राप्त शिक्षिका सायली लांबर, तसेच स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांना विनामूल्य अध्यापन करणाऱ्या रेखा कांबळे व रिया पाल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. विशेष म्हणजे, शाळेला यावर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO (9001:2015) मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेला मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
संध्याकाळी स्वच्छतादूत व युवा प्रबोधनकार सगुण जाधव यांनी ‘संत गाडगेबाबा’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून समाजप्रबोधन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्रीमती दिपाली भालेकर (सभापती, महिला व बालकल्याण समिती, नगरपरिषद सावंतवाडी), राजू भालेकर (सामाजिक कार्यकर्ते), सविता परब (गटशिक्षणाधिकारी, सावंतवाडी), सहदेव चव्हाण (ISO समन्वयक, कोकण विभाग), कमलाकर ठाकूर (केंद्रप्रमुख), दिलीप भालेकर (शिक्षणतज्ज्ञ), संतोष तळवणेकर (जिल्हाध्यक्ष, राजे प्रतिष्ठान सिंधुदुर्ग), सतीश धुमाळे (मुख्याध्यापक, वि.स. खांडेकर हायस्कूल) तसेच अभिनव ॲकॅडमीचे प्राचार्य पोळ सर उपस्थित होते.
कार्यक्रमास आरोग्य व क्रीडा समिती सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दहा हजार रुपयांची देणगी देऊन शुभेच्छा दिल्या, तर शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर यांनी पाच हजार रुपयांचे योगदान दिले. पालकवर्गानेही मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्षा पूनम तुयेकर, शिक्षणतज्ज्ञ दिलीप भालेकर, ईश्वरी तेजम, गुरुप्रसाद तेजम, जान्हवी वारीक, अश्विनी गावडे, दिपा गावडे, मयुरेश सुतार तसेच शिक्षकवृंद केशव जाधव, सायली लांबर, रेखा कांबळे, रिया पाल आदींनी विशेष परिश्रम घेतले.
विविधरंगी कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला.
