राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करणे हे कृत्य हास्यास्पद…

साक्षी वंजारी: युतीशिवाय शिंदे सेनेच मतदारसंघात स्वतंत्र अस्तित्व काय..?

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करणे हे कृत्य हास्यास्पद असून, एका प्रादेशिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर बोलताना आपली उंची, अभ्यास आणि जबाबदारी लक्षात घ्यावी, अशी टीका काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारे यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या की, भारत-अमेरिका व्यापार करारासारख्या देशपातळीवरील विषयावर राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाने अधिकृत भूमिका मांडलेली नसताना स्थानिक पातळीवर अशा प्रकारे आंदोलन करणे योग्य नाही. “सूर्यावर उडवलेली थुंकी स्वतःच्याच तोंडावर पडते,” असे म्हणत त्यांनी राहुल गांधी सत्य मांडत असल्याचा दावा केला.

हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले, अभ्यासू आणि राष्ट्रीय स्तरावरील विरोधी पक्षनेते म्हणून ओळख असलेल्या राहुल गांधी यांच्याबाबत अशा प्रकारचे कृत्य करणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
जागतिक स्तरावर चर्चेत असलेल्या ‘एपिस्टन फाईल’ प्रकरणासह महिलांवरील अत्याचार, मुंबईसह राज्यात बेपत्ता होणाऱ्या महिला व मुली यांसारख्या गंभीर प्रश्नांवर आंदोलन करणे अधिक गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. भविष्यात या विषयांवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
राजकारणात स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करू नयेत, तसेच युतीशिवाय शिंदे सेनेला स्वतंत्र अस्तित्व नाही, असा टोला त्यांनी लगावला. सावंतवाडीतील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी नगरपालिका निवडणुकीतील पराभव व टीकाटिप्पणीमुळे झालेल्या नुकसानीचा विचार जिल्हा नेतृत्वाने करावा, असेही नमूद केले.

You cannot copy content of this page