⚡दोडामार्ग ता.२१-:
तिलारी शेटवेवाडी येथील युवक साहिल शरद शेटवे याने अवघ्या २२ व्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन करत नवी मुंबई मेट्रो लाईन–१ (NMML-1) मध्ये निवड मिळवली आहे. सीबीडी बेलापूर ते पेणधर या महत्त्वाच्या मार्गावर कार्यरत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात त्याची निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
साहिल हा कट्टर राणे समर्थक म्हणून ओळख असलेले कै. शरद शेटवे यांचा सुपुत्र असून शासकीय ठेकेदार ज्ञानेश्वर शेटवे यांचा पुतण्या आहे. कुटुंबाची सामाजिक पार्श्वभूमी आणि स्वतःची मेहनत, जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर साहिलने हे यश मिळवले आहे.
नवी मुंबई मेट्रो ही आधुनिक, वेगवान आणि नियोजित नागरी वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा मानली जाते. अशा प्रतिष्ठित प्रकल्पात स्थान मिळवणे ही अभिमानाची बाब असून ग्रामीण भागातील युवकाने महानगरातील या प्रकल्पात संधी मिळवणे इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
साहिलच्या निवडीची बातमी समजताच तिलारी शेटवेवाडी येथे आनंदाचे वातावरण पसरले. यावेळी शिवसेनेचे शैलेश दळवी, प्रेमानंद देसाई तसेच सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी साहिलच्या निवासस्थानी भेट देऊन त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विनायक शेटये, ज्ञानेश्वर शेटवे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही साहिलच्या यशाचे कौतुक करत, “ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत,” असा संदेश दिला.
साहिल शेटवे यांच्या या यशामुळे तिलारी शेटवेवाडीचे नाव उज्ज्वल झाले असून परिसरातील तरुणांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.
वयाच्या २२ व्या वर्षी साहिल शेटवेची मोठी झेप; नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात निवड…
