तळेखोल गावात CSR निधीतून विकासकामांना वेग; पाणीटंचाई दूर होण्याची आशा…

⚡दोडामार्ग ता.२१-:
तळेखोल गावात CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीच्या माध्यमातून विविध विकासकामांना वेग आला असून गावातील मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. DSV आणि Voluntary Health Association of Goa यांच्या संयुक्त विद्यमाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
या उपक्रमांतर्गत तळेखोल येथील वाटुळवाडी परिसरात विहीर बांधकामासह पाण्याच्या टाकीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीटंचाईच्या समस्येला लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली.
सदर कामांसाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात Vikas Kulkarni यांची महत्त्वाची भूमिका राहिल्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गावाच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे ही कामे शक्य झाली, असेही त्यांनी नमूद केले.
याबाबत बोलताना तळेखोलच्या सरपंच वंदना सावंत, उपसरपंच महादेव नाईक व ग्रामपंचायत सदस्यांनी संबंधित संस्थांचे आभार मानले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज असून भविष्यातही सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page