वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांची कार्यतत्परता….

फेसबुक व्हिडिओची दखल ; कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हर्नियाचे यशस्वी ऑपरेशन:रुग्ण महिलेने मानले पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यासह कणकवलीतील जागरूक पत्रकारांचे आभार..

⚡कणकवली ता.२१-: कणकवली उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी फेसबुकवरील व्हिडिओ पोस्टची तातडीने दखल घेत रुग्णाला दिलासा दिला. कलमठ येथील रहिवासी नंदिनी नितीन मर्तल यांनी हर्निया ऑपरेशन संदर्भात सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली होती. जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांत अनेक फेऱ्या मारूनही ऑपरेशनबाबत समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील एका सर्जन डॉक्टरांनी हे ऑपरेशन येथे होत नसल्याचे सांगत आपल्या खाजगी रुग्णालयात येण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले होते, अशी तक्रार सौ. मर्तल यांनी केली.

दरम्यान, तालुक्यातील एका खासगी रुग्णालयावर झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीतील जागरूक पत्रकारांनी संबंधित महिलेचा व्हिडिओ पालकमंत्री ना. नितेश राणे तसेच वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांच्या निदर्शनास आणून दिला.

ही बाब समजताच डॉ. विशाल रेड्डी यांनी तातडीने नंदिनी मर्तल यांना रुग्णालयात बोलावून घेतले. आवश्यक तपासण्या करून रुग्णालयात सर्जन उपलब्ध नसल्याने दुसऱ्या शासकीय रुग्णालयातील सर्जन डॉक्टरांना बोलावण्यात आले. अवघ्या दोन दिवसांत हर्नियाचे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले. उपचारानंतर नंदिनी मर्तल यांनी डॉ. विशाल रेड्डी, डॉ. पंकज पाटील आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे आभार मानले.

जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिली जाणारी सेवा, शस्त्रक्रिया आणि रुग्णांची समोरासमोर विचारपूस करण्याची पद्धत उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य उपचार मिळाल्याने आपण पूर्णपणे बऱ्या झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

You cannot copy content of this page