पंचायत प्रगती निर्देशांक मध्ये झाराप ग्रामपंचायतीची राज्यात मोठी झेप..
कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या ‘पंचायत प्रगती निर्देशांक ‘ अंतर्गत राबवण्यात आलेल्या सर्वेक्षणात कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायतीने राज्यात पहिल्या क्रमांकाचे नामांकन पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामुळे झारापला आता ‘स्वच्छ व हरित ग्राम’ मानांकन मिळवण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली असून, प्रशासकीय स्तरावर आणि ग्रामस्थ स्तरावर जोरदार तयारी सुरू झाली आहे.
विकासाची स्पर्धा आणि भविष्याचे व्हिजन
या संदर्भात मार्गदर्शन करताना भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. देवधर म्हणाले की, “शासन आता स्पर्धात्मक विकास आणि विकासाची स्पर्धा या दोन माध्यमांतून गावांचा कायापालट करत आहे. याआधी आंबडोस, साळेल, तळवडे ही गावे चर्चेत होती, आता झारापची स्पर्धा थेट मिझोरम आणि तेलंगणासारख्या राज्यांशी होणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, “देवाने आपल्या ओंजळीत सोन्याची वीट टाकली आहे, ती मातीत पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. येणाऱ्या कमिटीला केवळ कागदोपत्री माहिती देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती दाखवावी लागेल. अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलाचे पुढील २५ वर्षांचे व्हिजन काय आहे, इथपर्यंतचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासाठीच ही ‘रंगीत तालीम’ महत्त्वाची आहे.”
प्रशासकीय पडताळणी आणि सज्जता
कुडाळचे गटविकास अधिकारी (BDO) प्रफुल्ल वालावलकर यांनी माहिती दिली की, “पंचायत प्रगती निर्देशांक ” पोर्टलवर ग्रामपंचायतींनी भरलेल्या माहितीनुसार झारापचा राज्यात पहिला क्रमांक लागला आहे. आता या माहितीची शहानिशा करण्यासाठी केंद्रीय कमिटी नेमण्यात आली आहे. येत्या ३-४ दिवसांत ही कमिटी गावात दाखल होईल.”
ग्रामपंचायतीने डिजिटल वर्ग आणि इतर सर्व सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. झारापच्या या यशात भगीरथ प्रतिष्ठानचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही वालावलकर यांनी आवर्जून नमूद केले.
तरुणांचा सहभाग आणि गावाची प्रतिष्ठा
माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम तेली यांनी गावातील तरुण वर्गाच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. “गावातल्या तरुणांची कामे अत्यंत वाखाणण्याजोगी आहेत. आजूबाजूच्या गावांमध्ये झारापच्या स्वच्छतेची आणि सौंदर्याची चर्चा आहे. झारापचा हा आदर्श घेऊन इतर गावेही विकासासाठी प्रयत्न करतील, ही अभिमानाची गोष्ट आहे,” असे ते म्हणाले.
