बांदा-मडूरा येथे मोकळा श्वास फाऊंडेशनकडून व्यसनमुक्ती जनजागृती अभियान…

⚡बांदा ता.२०-: मोकळा श्वास फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व मडूरा येथील विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ आणि विविध व्यसनांपासून दूर राहण्याबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनप्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.
बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांशी फाऊंडेशनचे संस्थापक तथा अध्यक्ष राजेश सावंत यांनी संवाद साधला. व्यसनांचे प्रकार, व्यसनाची सुरुवात कशी होते, नकळत आपण कुठे चुकू शकतो, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत तसेच व्यसनातून बाहेर पडण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
“आजच्या युगात सजगपणे जगणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीच्या सवयींपासून दूर राहिल्यासच आपले भविष्य सुरक्षित राहील,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती व्यसनामुळे त्रस्त असल्यास संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मडूरा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हायस्कूल विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थी जीवनातील शिस्त, पालकांचा सन्मान आणि शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “शिक्षक हे तुमचे मित्र आहेत; कोणतीही समस्या मनात न ठेवता त्यांच्याशी बोला,” असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी मुख्याध्यापक प्रदीप देसाई यांनी मोकळा श्वास फाऊंडेशनचे कार्य स्तुत्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बांदा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री देसाई व मडूरा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सायली परब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जागरूकता निर्माण करून निरोगी व सुदृढ समाज घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
फोटो:-
मडूरा हायस्कुल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेश सावंत.

You cannot copy content of this page