सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकरी यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देणार…

राज्य मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे मुंबई येथे बैठकीत आश्वासन..

⚡वेंगुर्ला ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देणार, असे आश्वासन आज शुक्रवारी (20 फेब्रुवारी ) राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकरी यांच्या शिष्टमंडळाला दिले. यावर्षी नैसर्गिक वातावरणामुळे आंबा उत्पादक शेतकरी पूर्णतः नुकसानीत आहे. शेतकऱ्यांचे 85 ते 90 टक्के इतके नुकसान झाले आहे. याबाबत आज मुंबई येथे मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकरी, शास्त्रज्ञ यांची मंत्री ना. नितेश राणे यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीस दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे हे ऑनलाईन उपस्थित होते. तसेच दापोली कोकण कृषी विद्यापिठाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे, सहसंचालक शिवाजी आमले, संचालक अंकुश माने, गिर्ये केंद्र यांचे शास्त्रज्ञ्, अधिकारी, वेंगुर्ला येथील कृषी उद्यानपंडित शेतकरी विलास ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा आंबा काजू बागायतदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश चमणकर, वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघांचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, आडेली पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, जनार्दन पडवळ, नगरसेवक संदेश निकम, देवगड येथील बागायतदार विद्याधर जोशी, महेश गोखले, संतोष पडेलकर, दत्तात्रय बलवान आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी अधिवेशनसह राज्य स्तरावर जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. खा. नारायण राणे हेही याबाबतीत शेतकऱ्यांना योग्यवेळी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. सर्व विभाग, संशोधन केंद्र, शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत ऍग्री असून योग्य अहवाल देण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत . त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार यांना
अधिकाधिक नुकसानभरपाई मिळवून देणार, असे आश्वासन ना.नितेश राणे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बागायतदार शिष्टमंडळाला दिले. वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत बैठक घेत ना. नितेश राणे यांच्याकडे पुढील त्वरित पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्वरित आज शुक्रवारी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार शिष्टमंडळ यांनी ना. नितेश राणे यांची भेट घेतली.

You cannot copy content of this page