मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंती उत्साहात साजरी…

शिवकालीन दुर्मिळ व निवडक प्रतिकृतींच्या प्रदर्शनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१९-: तालुक्यातील मळगाव–रस्तावाडी येथील शिवभक्त ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शिवजयंतीनिमित्त खास राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंच्या प्रदर्शनाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमाचे यंदाचे सलग आठवे वर्ष असून, शिवकालीन इतिहासाचे संवर्धन व पुढील पिढीपर्यंत तो प्रभावीपणे पोहोचावा या संकल्पनेतून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. खास राणे यांच्या संकल्पनेतून शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. सकाळपासूनच या प्रदर्शनास सुरुवात झाली असून हे प्रदर्शन रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये शिवकालीन इतिहासाचे विविध पैलू जिवंत करणाऱ्या निवडक व दुर्मिळ प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. मराठा आरमाराच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणाऱ्या मराठा आरमारातील तब्बल आठ जहाजांच्या प्रतिकृती, तसेच जहाजांवर वापरण्यात येणाऱ्या तोफांच्या प्रतिकृती हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.
मराठ्यांच्या शस्त्रागारातील प्रमुख शस्त्र असलेली मराठा धोप, मावळ्यांच्या शौर्याचे प्रतीक असलेली वर्क धोप, तसेच शिवइतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असलेल्या अफजलखान वधप्रसंगी वापरण्यात आलेल्या वाघनखे व कट्यार यांच्या प्रतिकृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. यासोबतच, मराठा आरमार ग्रंथातील २२ ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शन, पावनखिंडीत पराक्रम गाजवून बलिदान दिलेल्या बाजीप्रभू देशपांडे यांची ऐतिहासिक वंशावळ व दांडपट्टा, शिवकालीन संदर्भ ग्रंथ, मराठा शस्त्रागारातील उर्मी व दांडपट्टा यांसारखी शस्त्रे अभ्यासकांसाठी विशेष ठरली.
प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अस्सल पेहराव दर्शविणारी दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक शिक्क्यांचे मजकूर, गोमंतकीय भागातील दुर्गांची माहिती, छत्रपती संभाजी महाराज यांचे हस्ताक्षर, मनुची संग्रहातील शिवाजी महाराजांची छायाचित्रे, तसेच ऐतिहासिक नाण्यांचे विशेष प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
याशिवाय, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२ किल्ले व दुर्गांची छायाचित्रे पाहून इतिहासप्रेमींना कोकणातील दुर्गवैभवाची सखोल ओळख झाली. संपूर्ण प्रदर्शनामुळे उपस्थितांना शिवकालीन इतिहास केवळ वाचण्याऐवजी प्रत्यक्ष अनुभवण्याची दुर्मिळ संधी मिळाली. राणे यांनी शिवजयंतीनिमित्त मांडलेले हे प्रदर्शन केवळ एक प्रदर्शन नसून एक दिवसाचे शिवअभ्यास पर्व असल्याचे मत अनेकांनी व्यक्त करत तरुण पिढीला शिवविचारांची प्रेरणा मिळत असल्याचेही अनेकांनी यावेळी सांगितले. शिवभक्त ज्ञानेश्वर राणे यांनी राबविलेल्या या यां उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. राणे यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील ७१ जिल्हा परिषद शाळांमध्ये भेट देत या सर्व ऐतिहासिक वस्तूंची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली असून, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव व प्रेरणा मिळावी यासाठी मार्गदर्शन केले आहे. यापुढेही अशाच प्रकारचे ऐतिहासिक, शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रम सातत्याने राबवले जातील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिवसभरात मळगावसह पंचक्रोशीतील शिवभक्त, इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रदर्शनाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page