⚡कणकवली ता.१९-: मागील २१ वर्षांपासून सातत्याने सामाजिक कार्य करणाऱ्या लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडीच्या कार्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कौतुक केले. युवकांची एकी हीच खरी ताकद असून अशा मंडळांमुळे समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होते, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या वतीने कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देत मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
तसेच कै. प्रमोद परब स्मरणार्थ “एक तालुका एक संघ” या धर्तीवर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ हळवल सरपंच अपर्णा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, उपसरपंच प्रभाकर राणे, सुभाष परब, अशोक परब, विजय परब, सुभाष भागोजी परब, डॉ. दिलीप घाडी आदी मान्यवर उपस्थित होते.
