मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत वैभव नाईक यांच्याकडून दिशाभूल…

दत्ता सामंत:त्यांच्याच कार्यकाळात ३५२ मच्छिमारांना नोटिसा आल्या होत्या, मग तेव्हा त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही..?

⚡मालवण ता.१९-:
मालवण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांना बांधकामाबाबत येणाऱ्या नोटिसांच्या प्रश्नावर माजी आमदार वैभव नाईक हे चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करत आहेत. मुळात २०१६ ते २०२४ या त्यांच्याच कार्यकाळात ३५२ मच्छिमारांना नोटिसा आल्या होत्या, मग तेव्हा त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही? असा प्रश्न करत नाईकांनी साध्या आजाराचे रूपांतर कॅन्सरमध्ये करून ठेवले आहे. आता आमदार निलेश राणे त्यावर प्रभावी शस्त्रक्रिया करत आहेत,” अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी वैभव नाईक यांच्यावर टीका केली, तसेच मच्छिमार बांधवांवर ओढवलेले हे संकट कायमस्वरूपी टळेल, असा विश्वासही श्री. सामंत यांनी व्यक्त केला.

मालवण येथील महायुतीच्या कार्यालयात दत्ता सामंत यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी संजय पडते, काका कुडाळकर, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, भाऊ मोरजे, सूर्यकांत फणसेकर, राजू बिडये, भाई मांजरेकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी श्री. सामंत म्हणाले, २०१४ सालापासून आमदार असताना वैभव नाईक यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याच काळात सर्वाधिक नोटिसा आल्या असताना, आता ते केवळ राजकारण करण्यासाठी अकलेचे तारे तोडत आहेत. मच्छिमार बांधवांना नोटिसा मिळताच आमदार निलेश राणे यांनी संबंधित मच्छिमार कोणत्या पक्षाचा आहे, हे न पाहता त्यांना आधार दिला. गरीब जनतेच्या उदरनिर्वाहाचे साधन वाचवण्यासाठी ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत. वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांचीही फसवणूक करत आहेत, असा आरोप सामंत यांनी केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी दिलेले उमेदवार विकले गेले किंवा त्यांनी माघार घेतली. ठाकरे शिवसेनेचे जहाज आता भरकटले असून नाईकांनी आधी आपला उरलासुरला पक्ष सांभाळावा, असा टोला त्यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची गंगा वाहत आहे. याच कामावर विश्वास ठेवून जनतेने महायुतीला निवडणुकीत मोठे यश दिले आहे. वैभव नाईक यांनी आता आपली केविलवाणी धडपड थांबवावी. निलेश राणे ज्या वेगाने काम करत आहेत, ते पाहता या मतदारसंघात त्यांचा स्पर्धा करणारा कोणीही उरलेला नाही. नाईक यांनी कितीही चक्रव्यूह रचले, तरी निलेश राणेंचा अश्वमेध रोखण्याची ताकद आता कोणातही नाही असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page