⚡सावंतवाडी ता.१९-: प्रचंड सत्तेची ताकद, पैसा आणि बळाचा वापर करून झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, सर्व आव्हानांना तोंड देत ताठ मानेने जनतेच्या दरबारात उभे राहिलेल्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा सन्मान सोहळा सावंतवाडीत पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता.
धैर्याला सलाम: पराभूत आणि विजयी उमेदवारांचा सत्कार
निवडणुकीत विजय संपादन केलेल्यांसोबतच, सत्तेच्या विरोधात मोठ्या धैर्याने लढणाऱ्या पराभूत उमेदवारांचाही भगवी शाल घालून विशेष सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती: नवनिर्वाचित नगरसेवक देवेंद्र टेमकर, नवनिर्वाचित सातार्डा पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये.
लढाऊ बाणा दाखवणारे सत्कारमूर्ती: सीमा मठकर, शैलेश गवंडळकर, रुपेश राऊळ, निशिकांत तोरसकर, फिलिप्स रॉड्रिक्स, विनोद काजरेकर आणि निष्ठावंत शिवसैनिक शब्बीर मणियार यांचा तालुकाप्रमुख रमेश सावंत व राजू शेटकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
छत्रपतींचा बाणा प्रत्येक शिवसैनिकात हवा – रुपेश राऊळ
यावेळी बोलताना विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ म्हणाले की,
“छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. मुघली सत्तेसमोर महाराजांनी ज्या धैर्याने स्वराज्य स्थापन केले, तोच वारसा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जपला. आजच्या परिस्थितीत पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर निवडणुका लढवल्या जात असताना, आमचे शिवसैनिक डगमगले नाहीत. छत्रपतींचा बाणा, नेतृत्व आणि मुत्सद्दीपणा प्रत्येक शिवसैनिकाने अंगी बाणवायला हवा.”
उपस्थित पदाधिकारी
या सोहळ्याला उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, शहरप्रमुख शैलेश गवंडळकर, महिला तालुका संघटक नम्रता झारापकर, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, अशोक धुरी, विनोद काजरेकर, दादु सावंत, राजा वाडकर, प्रशांत बुगडे, रुपेश गावडे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
