चेंदवण हायस्कुल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा…

⚡कुडाळ ता.१९-: चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर ईशस्तवन व स्वागतगीत सुस्वरात सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी महेश भरत खडपकर (अप्लाइड आर्ट्स – ग्राफिक डिझायनर) तसेच वालावल गावचे व पाट हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक संदीप साळसकर उपस्थित होते. दोन्ही प्रमुख पाहुणे हे चित्रकार असून त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “आजचा युवक हेच युगाचे बळ” असल्याचे सांगितले. मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर करून ध्येयपूर्तीकडे वाटचाल करण्याचा संदेश देत त्यांनी परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी प्रशालेचा माजी विद्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित झाल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला. महेश भरत खडपकर यांना कठीण परिस्थितीत शिक्षण देणारे त्यांचे वडील भरत अर्जून खडपकर यांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यालयाला मंचावरील टेबल भेट दिले. माजी विद्यार्थीनी माधवी नाईक हिने दरवर्षीप्रमाणे यंदाही इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा किट देण्याची परंपरा कायम ठेवली. तिच्या वतीने तिचे आई-वडील उपस्थित राहून परीक्षा किटचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाबद्दल माधवी नाईक यांच्या आई-वडिलांचा प्रशालेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रस्तावना मुख्याध्यापक माणिक पवार यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी मृण्मयी खोबरेकर व युगांती मेस्त्री यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद नाईक यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक माणिक पवार यांना जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल कवठी व चेंदवण ग्रामस्थांच्या वतीने तसेच पोलिस पाटील उमेश शृंगारे, पो.पा. विठ्ठल राणे व शेखर मेस्त्री यांनी बुके देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेमार्फत व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी पालक महेश धुमाळ तसेच शिक्षक संतोष सांगळे, विजय कांबळी, उर्मिला गवस, निलेश तवटे, सिद्धी शिरसाट व सुप्रिया चेंदवणकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page