बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡कुडाळ ता.१९-: येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विशेषतः सीबीएसई सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज जन्मापासून त्यांच्या जन्म पाळणा म्हणणं, अफजलखान भेट, आग्र्याहून सुटका, शिवरायांचा राजदरबार, अशा शिवचरित्रातील विविध प्रसंगांची रेलचेल असलेल्या सवेष सादरीकरणातून अतिशय रंगतदारपणे शिवजन्मोत्सव साजरा केला.
प्रा. अरुण मर्गज यांच्या सहित शिक्षण संस्थेतील विविध प्राचार्यांच्या उपस्थितीमध्ये व त्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून व शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या वतीने बोलताना प्राचार्य अरुण मर्गज यांनी आजची स्थिती पाहता ” अंधार फार झाला…एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे.”असे म्हणत लोकराजा, निश्चयाचा महामेरू बहुत जणांचा आधारू, श्रीमंत योगी, जाणता राजा शिवछत्रपती यांची थोरवी वर्णन केली. तसेच सर्वधर्मसमभाव ठेवून रयतेसाठी कार्य करणाऱ्या छत्रपती शिवरायांची महती कथन केली.
प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी शिवछत्रपती महाराजांची जागतिक कीर्ती व त्यांनी आपल्या जीवन काळामध्ये केलेल्या संघर्षाची, विविध स्वाऱ्यांची, शिवाजी महाराजांच्या जन्म काळातील थरारक प्रसंगांची व लोकत्तर व्यक्तिमत्वाची आपल्या ओजस्वी भाषेतून उपस्थितांना माहिती करून दिली. तर रोहिदास राणे यांनी छत्रपती महाराजांच्या चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाची उपस्थितांना ओळख करून देताना कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेचा प्रसंग उपस्थिताना कथन करून शिवरायांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांच्या वतीने हिरा उजागरे,सानवी सावर्डे, सिया देसाई, आराध्या माघाडे यांनी शिवचरित्राची थोरवी वर्णन केली.
चेअरमन उमेश गाळवणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वजीत डांगमोडेकर, रोहिदास राणे,मयुरेश लाड,प्रसाद कानडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य परेश धावडे,प्रा. नितीन बांबर्डेकर,पल्लवी कामत,मंदार जोशी, विद्यार्थी, पालक व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी परब यांनी केले.

You cannot copy content of this page