⚡कणकवली ता.१९-: शिवजयंतीचे औचित्य साधत कणकवली शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व कलाकार उद्यानाच्या कामाचे भूमिपूजन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, हे काम पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्द प्रशासनाने दिला आहे.
या सोहळ्यास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, सतीश सावंत, संदेश सावंत, अबिद नाईक, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, अॅड. उमेश सावंत, मराठा समाजाचे नेते एस. टी. सावंत, मनोज रावराणे, सावी लोके, मुख्याधिकारी गौरी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि मराठा समाजबांधवांनी हजेरी लावली.
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शासनाच्या वतीने हे सांस्कृतिक भवन दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. सर्व आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून वर्षभरात भवन उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ‘अक्षरसिंधू कलामंच’च्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने भाई परब यांनी भावना व्यक्त करत प्रकल्पाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजयकुमार सर्वगोड यांनी केले.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीच्या वेळी मराठा समाजाने सांस्कृतिक भवनाची मागणी केली होती. शिवजयंतीच्या निमित्ताने दिलेला शब्द पूर्ण करताना मला अभिमान वाटत आहे. आवश्यक सर्व निधी शासन उपलब्ध करून देईल. कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाचा आदर्श घालून दिला. त्याच विचाराने जिल्ह्याचा विकास करण्याचे ध्येय असून, पुढील वर्षी १९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते या भवनाचे उद्घाटन करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
संपूर्ण परिसरात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
