महिला ढोल ताशा पथकाचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात साजरा …

⚡देवगड ता.१८-:
सिंधु संजीवन संस्था संचलित तेजस्वी महिला ढोल ताशा पथक, देवगड यांच्या द्वितीय वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात श्री रामेश्वर हायस्कूल, मिठबांव येथे संपन्न झाला. या सोहळ्याला परिसरातील महिला, विद्यार्थी आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्सवी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

या वर्धापन दिनाचे तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून हिंदळे, तांबळडेग, दहिबाव, बागमळा, मिठबांव आणि आजूबाजूच्या गावांतील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद (कुणकेश्वर विभाग) सदस्य श्री सुनील बाळकृष्ण पारकर आणि देवगड पंचायत समिती (कुणकेश्वर गण) सदस्य श्री अमोल विजय लोके यांच्या सहकार्याने मिठबांव येथे महिलांसाठी तसेच हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी निशुल्क ढोल-ताशा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले.

हे प्रशिक्षण केंद्र श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, मिठबांव भंडारवाडी येथे कार्यरत होणार आहे.या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते विधिवत पार पडला. यावेळी जिल्हा परिषद (कुणकेश्वर विभाग) सदस्य श्री सुनील बाळकृष्ण पारकर, देवगड पंचायत समिती (कुणकेश्वर गण) सदस्य श्री अमोल विजय लोके, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट माजी अध्यक्ष श्री संतोष हरी लब्दे, संस्था अध्यक्ष श्री चंद्रकांत विश्राम घाडी, ग्रामसेवक श्री पांडुरंग शेटगे, ग्रामसखी मंजिरी मांजरेकर , ग्रामसखी स्मिता जाधव, श्री रामेश्वर हायस्कूल मिठबांवचे मुख्याध्यापक रमेश राऊत सर आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि पारंपरिक कला जपण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत पथकाला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तेजस्वी महिला ढोल ताशा पथकाने अल्पावधीतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्यातील कला, आत्मविश्वास आणि संघभावना वृद्धिंगत करण्याचे कार्य हे पथक सातत्याने करत आहे. नव्याने सुरू झालेल्या प्रशिक्षण केंद्रामुळे ग्रामीण भागातील महिलांना आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, भविष्यात अधिकाधिक महिला या क्षेत्रात पुढे येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पथकातील महिला प्रतिनिधी पुनम मयेकर, वैदेही प्रभू, तेजस्वी कदम आणि करण मेस्त्री यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध आणि समन्वयपूर्ण कार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

You cannot copy content of this page