आम. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर पलटवार..
⚡मालवण ता.१८-:
किनारपट्टीवरील बांधकामे हटविण्याबाबत मालवण मधील मच्छिमारांना आपल्या काळात नोटीसा आल्या नाहीत असे वक्तव्य करणाऱ्या माजी आमदार वैभव नाईक यांचा अभ्यास कमी आहे. वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या काळात गेल्या दहा वर्षात मच्छिमारांना एकूण ३५२ नोटीसा प्राप्त झाल्या आहेत, याचे पुरावे व नोटीसा माझ्याकडे असून माहितीसाठी नाईक यांना हवे असतील मी पाठवून देईन. वैभव नाईक हे कोणतीही माहिती व पुरावे न घेता बोलतात, नेहमीच खोटे आरोप करतात. मच्छिमारांना मिळणाऱ्या या नोटीसांबाबत त्यांनी कधीही विधानसभेत प्रश्न उपस्थित केला नाही. मच्छिमार अडचणीत असले की त्याचा फायदा करून घेण्याचे काम वैभव नाईक करतात त्यामुळे वैभव नाईक हे बोगस माणूस असल्याचे आता मच्छिमारांना कळले आहे, अशी टीका आम. निलेश राणे यांनी करत आपण स्वतः व पालकमंत्री नितेश राणे मच्छिमारांचा बांधकाम विषयक प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे सांगितले.
मालवण किनारपट्टीवर सीआरझेडचे उल्लंघन करून बांधकामे केल्याप्रकरणी प्रशासनाने मच्छिमारांना नोटीसा बजावल्यानंतर आम. निलेश राणे यांनी कुडाळ प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात मच्छिमारांची बैठक घेतली होती. यावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी आम. निलेश राणे यांच्यावर टीका केल्यावर आम. निलेश राणे यांनी नाईक यांना प्रत्युत्तर दिले आहे.
मच्छिमारांच्या प्रश्नावर मी बैठक घेतल्याने वैभव नाईक यांना त्रास झाला. या नोटीसा आताच कशा येऊ लागल्या असे नाईक विचारतात. मुळात माझ्या आमदारकीच्या काळाला एक वर्षच पूर्ण झाले असून वैभव नाईक हे दहा वर्षे आमदार असताना त्या काळात ३५२ नोटीसा मच्छिमारांना आल्या असून त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे असताना आपल्या काळात एकही नोटीस आली नाही अशी खोटी माहिती नाईक देत आहेत. तसेच या नोटीसा मालवण मधील मच्छिमारांनाच का येतात असाही सवाल नाईक यांनी केला असून यावरून नाईक यांचा कोणताही अभ्यास नसल्याचे दिसून येते. मालवणमध्ये एका व्यक्तीकडून सातत्याने होणाऱ्या तक्रारीवरूनच या नोटीसा मच्छिमारांना बजावल्या जात आहेत, त्यामुळे जास्त नोटीसा या मालवण मधील मच्छिमारांना येत आहेत, मालवण बरोबरच वेंगुर्ला व देवगड येथील मच्छिमारांनाही वेगवेगळ्या विषयात नोटीसा बजावल्या जात आहेत. याची माहिती घेऊन नाईक यांनी अभ्यास करावा. केवळ कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे कोणतीही शहानिशा न करता नाईक हे खोटे आरोप करत आहेत, सातत्याने खोटे बोलण्याचा पुरस्कार कोणाला द्यायचा असेल तर तो वैभव नाईक यांना द्यावा, अशी टीका आम. नाईक यांनी केली.
मच्छिमारांचा बांधकाम विषयक प्रश्न कसा सोडवावा याचे ज्ञान वैभव नाईक यांना नाही. विधानसभेत त्यांनी कधी प्रश्न मांडला नाही, त्यामुळे आता नाईक यांना मच्छिमारांच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. आता मच्छिमार अडचणीत असल्याने त्याचा फायदा करून घेण्यासाठी नाईक खोटे आरोप करत आहेत. गेल्या दहा वर्षा वैभव नाईक यांना हा प्रश्न सोडवायला जमला नाही, त्यामुळे आम्ही नाईक यांच्यासारखे प्रश्न रेंगाळत ठेवणार नाही. मच्छिमारांच्या बांधकाम प्रश्नी आपण स्वतः व पालकमंत्री नितेश राणे आम्ही दोघेही मिळून लक्ष देत असून हा प्रश्न कायमस्वरूपी कसा सोडवता येईल व मच्छिमारांना दिलासा कसा येईल यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही आम. निलेश राणे म्हणाले.
