⚡दोडामार्ग ता.१८-:
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२५–२०२६ अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावी उपक्रम राबवित उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अभियानाच्या मूल्यमापनानंतर विविध जिल्हा परिषद प्रभागांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड जाहीर करण्यात आली आहे.
साटेली–भेडशी प्रभागातून सहभागी झालेल्या ११ ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत केर-भेकुर्लीची निवड करण्यात आली. मणेरी प्रभागातील १३ ग्रामपंचायतींमधून ग्रामपंचायत आडाळी, तर माटणे प्रभागातील १२ ग्रामपंचायतींपैकी ग्रामपंचायत तळेखोल यांनी स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवत आदर्श कामगिरी केली आहे.
गावपातळीवर स्वच्छतेबाबत जनजागृती, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता तसेच आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे या ग्रामपंचायतींची निवड झाली आहे. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून या यशामुळे इतर गावांनाही स्वच्छतेच्या उपक्रमात अधिक सक्रिय होण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
निवड झालेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीस प्रोत्साहनपर म्हणून प्रत्येकी ६० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी दिली.
स्वच्छतेच्या चळवळीत तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची उल्लेखनीय झेप…
