सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजन..
⚡सावंतवाडी ता.१८-: दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावात असलेल्या ऐतिहासिक हनुमंत गडावर उद्या गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्याची सुरुवात सकाळी ७.३० वाजता हनुमंत गडावर शिव पूजनाने होणार आहे. त्यानंतर उपस्थित शिवभक्त ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. या प्रसंगी परिसरात शिवमय वातावरण निर्माण होणार असून इतिहासाची साक्ष देणाऱ्या हनुमंत गडावर शिवचरित्राचे स्मरण करून महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे. या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला शिवप्रेमी, ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि फुकेरी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
