कोकण रेल्वेच्या कंत्राटी गेटमनवर बेरोजगारीची टांगती तलवार…

१ मार्च पासून माजी सैनिकांची गेटमन म्हणून वर्णी लागणार:अन्यायकारक निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा…

कुडाळ : कोकण रेल्वे मध्ये गेटमन म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सिंधुदुर्गातील १५ तरुणांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. प्रभात भट सिक्युरीटी एजन्सी, नवीदिल्ली यांच्या मार्फत जिल्ह्यात गेटमन म्हणून काम करणाऱ्या या तरुणांच्या जागी येत्या १ मार्च पासून माजी सैनिकांना घेतले जाणार आहे. त्यासाठी त्या माजी सैनिकांचे कोकण रेल्वे मार्फत प्रशिक्षण सुद्धा पूर्ण झाले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि २०२७ पर्यंत आपली ऑर्डर असताना अडीज वर्षांच्या सेवेनंतर तडकाफडकी कामावरून कमी करण्याचा हा निर्णय अन्यायकारक आहे. आम्हाला कामावरून काढून टाकू नका, याबाबत आम्हाला न्याय मिळवून द्या अशी मागणी या कंत्राटी गेटमन यांनी केली आहे. अन्याय झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असा इशाराच या कंत्राटी गेटमन यांनी दिला आहे.
कुडाळ येथे या कंत्राटी गेटमन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला. यावेळी बोलताना रजत लातये म्हणाले, अडीज वर्षांपूर्वी प्रभात भट सिक्युरीटी एजन्सी, नवीदिल्ली यांच्या मार्फत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकण रेल्वेमध्ये कंत्राटी गेटमन म्हणून कामाला सुरुवात केली. संपूर्ण कोकण रेल्वे मध्ये कोलाड ते ठोकूर सेक्शन मध्ये एकूण ९० कर्मचारी अशा कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक हे कणकवली, सिंधुदुर्ग स्टेशन, झाराप, सावंतवाडी, गोव्यातील वेरणा व माजोर्डा या ठिकाणी लेवल क्रॉसिंग गेटवर कार्यरत आहेत.
यामध्ये काही कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त सुद्धा तरुण आहेत. हे पंधरा युवक आपआपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ असून घरातील व कुटुंबातील सदस्य हे शेतीवर उदरनिर्वाह करत आहेत. कंत्राटी असली तरी या नोकरीत चांगले भवितव्य आहे म्हणून काही जणांनी हातातील खाजगी नोकऱ्या सोडल्या. काही जणांनी कर्ज घेतली. काही जणांची लग्न झाली. काही जणांची लग्न ठरली आहेत. पण अचानक १ मार्च पासून त्यांच्या जागी गेटमन म्हणून माजी सैनिकांची भरती होणार असल्याची माहिती खुद्द काही माजी सैनिकांनीच या कंत्राटी गेटमन यांना दिली. त्यांनी चौकशी केली असता हि बाब खरी असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. अडीज वर्ष चांगले काम करून देखील अचानक हातातले काम जाणार या भीतीने या कंत्राटी कामगारांत भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले.
कामावरून कमी करताना एक महिन्याची नोटीस आणि पगार दिला जातो. पण अजूनपर्यंत या कंत्राटी गेटमन याना अधिकृत अशी याबाबत कोणतीच पूर्वसूचना देण्यात आलेली नाही, असे या कंत्राटी गेटमन यांचे म्हणणे आहे. सिंधुदुर्गात १५ कंत्राटी गेटमन असून त्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे याकडे लक्ष वेधले. पालकमंत्री यांनी आपण यात लक्ष घालूतो अशी ग्वाही दिली असल्याचे देखील या कंत्राटी गेटमनांनी सांगितले.
याबाबत आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी या कंत्राटी कामगारांनी केली आहे. नाहीतर नाईलाजाने आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे. कोकण रेल्वेचे सीएमडी संतोषकुमार झा आणि सीपीओ बाळासाहेब निकम यांनी यात लक्ष घालून कंत्राटी गेटमन याना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या कंत्राटी गेटमन यांनी केली आहे.
यावेळी रजत लातये’ मंदार गावडे, श्यामसुंदर बर्डे, विनायक चिंदके, दिगंबर केसरकर,सुशांत चव्हाण, ओंकार जाधव, निखिल बागायतदार, सूर्यकांत झोरे, अनिकेत सावंत, प्रसाद सावंत, रितेश सावळ आदी कंत्राटी गेटमन उपस्थित होते.

You cannot copy content of this page