मालवण दि प्रतिनिधी
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेत असलेल्या सावरवाड येथील निर्वाण स्फटीक शिवलिंग मंदिरात आज
हर हर महादेव…. जय भोलेनाथच्या जयघोषात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी हिमालयीन स्फटीकापासून बनविलेल्या भारतातील सर्वात मोठ्या अशा सुमारे ५ फूट उंचीच्या शिवलिंगाचे पूजन करीत महाशिवरात्रीच्या उत्सवाचा शानदार प्रारंभ झाला. यानिमित्त सकाळपासून खास ग्रामस्थांसाठी या निर्वाण स्फटीक शिवलिंगासमोर रुद्राभिषेक करतानाच होमहवन करण्यात आला या धार्मिक कार्यक्रमाचे पौराहित्य रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टचे प्रमुख श्री रुद्रराज यांनी केले होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने कालपासून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण तालुक्यातील सावरवाड येथील हॉटेल चिकू सावली नजीक नव्याने स्थापन झालेल्या शिव मंदिरात आजपासून महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. या शिव मंदिरात सकाळपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्या बरोबरच मुंबई, पुणे, गोवा, दिल्ली, भोपाळ येथील क्रिया योग साधक तसेच हजारो शिव भक्तांनी गर्दी केली होती. सकाळी या शिव मंदिराचे प्रमुख श्री. रुद्रराज यांनी मंदिरातील स्पटिकाच्या शिवलिंगाची पूजाअर्चा करतानाच रुद्राभिषेक आणि गायत्री यज्ञाला प्रारंभ केला. यावेळी धुनी प्रज्वलीत करतानाच १०८ वेळा उपस्थित साधकांनी आणि शिव भक्तांनी रुद्र सुक्ताचे पठण करीत शिव नामाचा जयघोष केला. या जयघोषातच शंखनादासह घंटानाद करीत शिवाची आरतीही पार पडली. त्यानंतर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर काल महाशिवरात्रीच्या पुर्वसंध्येला शिव साधकांनी पूर्व जन्माचे आणि पूर्वजांचे असणारे कार्मिक दोष तसेच शरीर व्याधी मुक्तीसाठी शेणाने बनविलेल्या पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले
यावेळी रुद्राभिषेक व यज्ञ करण्यात आले. यावेळी रुद्रनाद फाउंडेशन ट्रस्टचे व्हाईस प्रेसिडेंट रोहन लेले, समेष रुद्रस्वर, विश्वस्त नीता नश्विन, ज्योती मेहेरा, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट राजेश पटेल, डॉ. प्रज्ञा पटेल, संतोष राणे, संजय शिंदे, अभिनेत्री विशाखा सुभेदार, राजकिरण अजितराज, रुद्रवीर महादेव, अनेय पालके, ऋषिकेश साळुंखे यांच्यासह विविध भागातून आलेले हजारो शिव भक्त उपस्थित होते.
अलीकडच्या काळात या स्फटीक शिवलिंगा बाबत मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाल्याने आजच्या महाशिवरात्री उत्सवास हजारो भाविकांनी पाय या मंदिराकडे वळले आहेत. भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने या स्फटीक शिवलिंगाचे दर्शन घेता यावे यासाठी रुद्रनाद फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबरच सावरवाड, कुसरवेवाडी येथील ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेत नियोजन केले आहे सायंकाळी उशिरापर्यंत या शिवमंदिरात भाविकांचा दर्शनासाठी ओघ सुरू होता .
