आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडभिसे यांच्या हस्ते कुणकेश्वरची शासकीय पूजा…

दर्श अमावास्येच्या महापर्वणीला भाविकांचा महासागर; २५५ पोलिसांचा चोख बंदोबस्त, २३ एसटी गाड्यांचे विशेष नियोजन..

⚡देवगड ता.१५-:
दक्षिण कोकणची काशी म्हणून ख्याती असलेल्या श्री देव कुणकेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री यात्रोत्सवाला अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात प्रारंभ झाला. दि. १५ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत पारंपरिक पद्धतीने हा यात्रोत्सव संपन्न होत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे. दर्श अमावास्येच्या महापर्वणीच्या पार्श्वभूमीवर भाविकांचा महासागर उसळला असून प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.

दि. १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता आमदार दीपक केसरकर व जिल्हाधिकारी तृप्ती धोडभिसे यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वराची पहिली शासकीय पूजा विधिवत पार पडली. मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, माजी उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उद्योजक सागर चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील, नगरसेविका स्नेहल जाधव, रेखा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही पूजा संपन्न झाल्यानंतर मध्यरात्री २.३० वाजता भाविकांसाठी दर्शनरांगा खुल्या करण्यात आल्या.

मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. पहाटे सहा वाजेपर्यंत मोठ्या संख्येने भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी दर्श अमावास्येचा पवित्र तीर्थस्नान योग आल्याने यात्रेला अधिकच धार्मिक महत्त्व प्राप्त झाले असून भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे.
मान्यवरांच्या भेटी, भक्तीचा जल्लोष
यात्रोत्सवाच्या निमित्ताने सकाळी पालकमंत्री नितेश राणे यांनी श्रींचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत माजी आमदार वैभव नाईक, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, आमदार कालिदास कोळंबकर, संजय आंग्रे, अजित गोगटे, पंचायत समिती सदस्य अमोल लोके, किंजवडे जि.प. सदस्या सावी लोके, हायकोर्ट न्यायाधीश अतुल रावराणे आदी मान्यवरांनीही उपस्थिती लावून श्रींच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. मंदिर परिसरात मान्यवरांच्या भेटींमुळे भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
प्रशासनाचे सुयोग्य नियोजन
यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून सुयोग्य आणि नेटके नियोजन करण्यात आले आहे. भाविकांना जलद दर्शन मिळावे यासाठी विशेष ‘व्हीआयपी दर्शन पास’ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच एसटी महामंडळ, वीज वितरण विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन पथक, दूरसंचार विभाग आदी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
यात्रेत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस टेहळणी पथक, देवस्थान ट्रस्टचे स्वयंसेवक कार्यरत असून परिसरात क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक अप्पर पोलीस अधीक्षक, दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, पाच पोलीस निरीक्षक, २१ सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १०९ पोलीस अंमलदार, १० वाहतूक पोलीस व १०७ होमगार्ड असा एकूण २५५ जणांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
वाहतुकीचे काटेकोर नियोजन
यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तारामुंबरी–मिठमुंबरी पुलामुळे देवगडकडील बहुतांश वाहतूक पुलावरून वळविण्यात आली आहे. तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून तारामुंबरी–मिठमुंबरी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी आस्मी हॉटेलजवळ, कणकवलीकडून गळगडा मार्गे येणाऱ्यांसाठी हॉटेल शिवसागरसमोर, तर आचरा–मिठबांव मार्गे येणाऱ्यांसाठी एमटीडीसीसमोरील वाळूवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
भाविकांच्या सोयीसाठी देवगड आगारातून २३ एसटी गाड्यांचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. देवगडमधून ११, नांदगाव २, पोयरे-खुडी-नारींग्रे १, शिरवली-चौकेवाडी १, नाद-ओंबळ १, आयनल-कोळोशी १, काजवडे-डोबवाडी १, आरे-निरोम १ अशा विविध मार्गांवर एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे.
यात्रेने फुललेला परिसर
यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे. विविध खेळण्यांचे स्टॉल, मिठाई व हॉटेल्स, मालवणी खाजा, कापड दुकाने, पारंपरिक शेती अवजारे यांची दुकाने उभारण्यात आली असून यात्रेचा पारंपरिक बाजार भरला आहे. कुणकेश्वर समुद्रकिनारी भेल, आईस्क्रीम व विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे किनाराही यात्रेमुळे उजळून निघाला आहे.
चार देवस्वाऱ्यांचे आगमन
महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर भेटीसाठी चार देवस्वाऱ्या आगमन करीत आहेत. यामध्ये श्री देव लिंगेश्वर पावणाई देवस्थान (जानवली, कणकवली), श्री देव नागेश्वर पावणादेवी देवस्थान (नागवे, कणकवली), श्री पावणाई रवळनाथ देवस्थान (मालोंड-बेलाचीवाडी, मालवण) आणि श्री देव गांगेश्वर देवस्थान (नारींग्रे, देवगड) यांचा समावेश आहे. यातील कणकवली तालुक्यातील नागवे व जाणवली येथील देवस्वाऱ्या सायंकाळी सहा नंतर कुणकेश्वरमध्ये दाखल झाल्या.
तसेच इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान कसबा आचरा येथील मानाचा नारळही विधिवत मिरवणुकीने कुणकेश्वर येथे आणण्यात आला. धार्मिक परंपरा आणि भक्तीभाव यांचा संगम असलेल्या या यात्रोत्सवामुळे देवगड तालुका अक्षरशः भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला असून शासन प्रशासनाकडून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page