Headlines

स्तनपान सप्ताहानिमित्त अंगणवाडीत जनजागृती कार्यक्रम…

⚡बांदा ता.०२-: जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त १ ते ७ ऑगस्ट दरम्यान विविध जनजागृती उपक्रम राबविले जात असून, त्याअंतर्गत अंगणवाडी केंद्र बांदा-निमजगा येथे स्तनपान जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात गर्भवती माता, स्तनदा माता तसेच परिसरातील महिलांना स्तनपानाचे महत्त्व, बाळाच्या सर्वांगीण विकासात स्तनपानाची भूमिका आणि जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आईचे पहिले दूध (कोलोस्ट्रम) बाळासाठी अत्यंत पोषक व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे असल्याने ते नवजात बालकाला अवश्य द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच केवळ आईचे दूध सहा महिने देण्याचे महत्त्व, स्वच्छतेची काळजी आणि स्तनपानामुळे माता व बालकाच्या आरोग्यास होणारे फायदे याबाबत उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये स्तनपानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
फोटो:-
बांदा-निमजगा अंगणवाडी केंद्रात आयोजित स्तनपान जनजागृती कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर व माता पालक.

You cannot copy content of this page