Headlines

कळसुलीत उद्या रानभाज्या प्रदर्शन व विक्री उपक्रम

पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासह रानभाज्यांच्या महत्त्वाची होणार जनजागृती

कणकवली : बदलत्या जीवनशैलीमुळे विस्मृतीत जात असलेल्या पारंपरिक रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कळसुली भोगनाथ नं. ३ यांच्या वतीने उद्या ३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय, कळसुली येथे रानभाज्या प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमातून स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या विविध रानभाज्यांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांच्या पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील पारंपरिक अन्नसंस्कृती, स्थानिक ज्ञानपरंपरा आणि नैसर्गिक अन्नसंपत्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रदर्शनात विविध प्रकारच्या रानभाज्यांसह परसबागेतील ताज्या भाज्यांचे प्रदर्शन आणि विक्रीही करण्यात येणार आहे. प्रत्येक रानभाजीची वैशिष्ट्ये, तिचे पोषणमूल्य आणि पारंपरिक आहारातील उपयोग याबाबत माहिती देण्यात येणार असून, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सकस आणि आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, जैवविविधतेचे महत्त्व आणि स्थानिक अन्नसंपत्तीबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून, ग्रामीण खाद्यसंस्कृती जपण्यासाठी ही या कार्यक्रमाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, पालक, महिला बचतगट, शेतकरी तसेच ग्रामस्थांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे आणि उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page