Headlines

ऑल इंडिया पब्लिक सेक्टर कॅरम स्पर्धेत सावंतवाडीची केशर निर्गुण उपविजेती…

महिला सांघिक गटात एएआय संघास विजेतेपद..

⚡कुडाळ ता.१५-: दि. 9 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत हाॅटेल सुर्या पॅलेस, बडोदा, गुजरात येथे झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचा समावेश असलेल्या ऑल इंडिया पब्लिक सेक्टर स्पोर्ट कंट्रोल बोर्ड आयोजित ऑल इंडिया पब्लिक सेक्टर कॅरम स्पर्धा 25-26 मध्ये सावंतवाडीची राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर राजेश निर्गुण हिने वैयक्तीक उपविजेते पदासह तिच्या एएआय संघाने सांघिक विजेतेपद पटकावले.
सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी राष्ट्रीय कॅरम खेळाडू केशर राजेश निर्गुण ही या स्पर्धेत भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एएआय) या संस्थेचे प्रतिनिधित्व करत होती. या स्पर्धेत महिलांच्या सांघिक गटात एएआय संघाने आरबीआय संघावर 2-1असा विजय मिळवून सांघिक विजेतेपद पटकावले. त्यापूर्वी उपांत्य फेरीत कॅगचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
महिला एकेरी गटातून खेळताना केशर निर्गुण हिने उपउपांत्यपूर्व फेरीत एलआयसी ची पी.निर्मला हिच्यावर मात करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत एलआयसी ची आंतरराष्ट्रीय खेळाडू एस.अपूर्वा वर सनसनाटी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत आपल्याच संस्थेची सहकारी खेळाडू मंताशा इक्बाल हिच्यावर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मात्र अंतिम सामन्यात आरबीआयची खेळाडू अंबिका हरिथबरोबर झालेल्या चुरशीच्या सामन्यात पराभव झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेतील पुरूषांच्या सांघिक गटात एएआय संघास चतुर्थ स्थानावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय विमान पत्तन प्राधिकरण संघास स्पर्धेतील सर्वोत्तम संघ म्हणून गौरविण्यात आले. या संघात केशर निर्गुण (महाराष्ट्र), मंताशा इक्बाल (उत्तर प्रदेश), निधी गुप्ता (चंदिगढ), व्ही.पूजा (पुडुचेरी), एस.कविवा (तामिळनाडू) यांचा समावेश होता.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला. केशर निर्गुण हिच्या या यशाबद्दल तिचे कॅरम क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page