पंधरा दिवसांत दुसरी घटना; विषबाधेचा संशय, प्रशासनासमोर गंभीर प्रश्न..
⚡कणकवली ता.०८-:काही दिवसांपूर्वी कणकवली शहरात पाच जनावरांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. वैद्यकीय अहवालानुसार विषबाधेमुळे हा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशातच आज पुन्हा एकदा कणकवली शहरात तीन म्हैशी मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व महेश सावंत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. बिडयेवाडी येथील पुजारे नामक शेतकऱ्यांच्या या तीन म्हैशी असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे म्हणाले,
ही अतिशय चिंताजनक बाब आहे. एखादा अपघात एकदाच होऊ शकतो, मात्र पंधरा दिवसांच्या अंतराने अशा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे याच परिसरात जनावरांचे मृत्यू होत आहेत. शहरात अनेक ठिकाणी गुरे मोकाट फिरत असतात, पण याच भागात असे प्रकार का घडतात, याचा सखोल अभ्यास नगरपंचायत व पशुवैद्यकीय प्रशासनाने करणे गरजेचे आहे. ही जनावरे फूड पॉयझनिंगमुळे मरण पावत आहेत का, याचा तपास व्हायला हवा. तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपली जनावरे बाहेर सोडू नयेत. गुरे ही शेतकऱ्यांची संपत्ती आहे.
तर महेश सावंत म्हणाले की, घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी काही पॅकिंग असलेल्या पुड्या आढळून आल्या. त्या केमिकलसारख्या असून त्याला उग्र वास येत होता. याची माहिती आम्ही पशुवैद्यकीय तसेच नगरपंचायत प्रशासनाला दिली आहे. कदाचित ते खाल्ल्यामुळेच जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वारंवार होणाऱ्या जनावरांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाकडून याबाबत तातडीने तपास करून ठोस उपाययोजना केल्या जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
