⚡देवगड ता.०८-: श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा सोहळ्याचे आयोजन देवगड तालुक्यात १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत केले असून. स्वामीच्या पादुकांची पालखी या ठिकाणी भाविकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. श्री स्वामी भक्तांनी स्वामींच्या पालखी पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २९ वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पालखी परिक्रमा कार्यक्रम सुरू असून यावर्षी १६ नोव्हेंबर २०२५ ते १५ जुलै २०२६ पर्यंत पालखी परिक्रमेचा कार्यक्रम आहे यामध्ये देवगड तालुक्यात गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता देवगड जामसंडे शहरात पालखीचे आगमन होणार असून रात्री ही पालखी श्री स्वामी समर्थ मंडळ कार्यालय, जामसंडे येथे मुक्कामी असणार आहे.
शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नाडण येथील स्वामीभक्त मकरंद जोशी यांचे निवासस्थानी त्यानंतर १० वाजता कातवण येथील बाबू शिंदे (प्रशांत शिंदे) यांच्या निवासस्थानी , कातवण येथून ही पालखी ११ वाजता श्री स्वामी समर्थ मठ मिठबाव येथे येणार असून येथे ११ ते ४ :०० यावेळेत भाविकांनी दर्शनाची व महाप्रसादाची लाभ घ्यावा असे आयोजक श्री स्वामी समर्थ मठ मिठबाव यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० ते ५:०० यावेळेत किंजवडे येथील स्वामीभक्त किरण टेंबुलकर यांच्या निवासस्थानी येणार आहे.किंजवडेहून सायंकाळी ५ नंतर तळेबाजार येथे मार्गस्थ होऊन तेथील गणेश मंदिर येथे मुक्कामी असणार आहे.शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० ते १० वाजता श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे व तेथून पुढील प्रवासासाठी पालखी प्रस्थान करेल.या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असून, सर्व स्वामी भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहन देवगड,जामसंडे,मिठबाव,किंजवडे, तळेबाजार, हडपिड येथील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष विजय उर्फ अमोल राजे भोसले यांच्या संकल्पनेतून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुका परिक्रमा संपूर्ण महाराष्ट्रभर काढली जाते.यामागचा उद्देश असा की अनेक स्वामी भक्त आहेत मात्र महाराष्ट्रातील गावोगावी असलेल्या काही स्वामी भक्तांना इच्छा असूनही स्वामींच्या मूळ गावे अक्कलकोट येथे येता येत नाही अशा स्वामी भक्तांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर पालखी परिक्रमेचे आयोजन केले जाते या पालखीचे माध्यमातून स्वामी आपल्या भक्तांना गावोगाव येऊन भेट देत आहे. या पालखी मधून जमा होणारी देणगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या ठिकाणी येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांच्या महाप्रसादासाठी व तसेच त्यांच्या राहणीमानाची व्यवस्था या सर्व कामासाठी खर्च केली जाते.अक्कलकोट येथे नियोजित महाप्रसाद गृहांची मोठी इमारत नियोजित असून याचे क्षेत्र १ लाख १९ हजार ९९८ चौरस फूट असणार आहे. या इमारतीवरती स्वामी समर्थांची ५१ फुटाची भव्यमूर्ती साकारणार आहे. यासाठी आपणही आपला खारीचा वाटा यात देऊन महाप्रसादगृहाच्या बांधकाम सेवेत सहभागी व्हा असे आवाहन करण्यात येत आहे.
