*💫देवगड दि.१८-:* देवगड तालुक्यामध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे सुमारे ५०० हून अधिक घरे, ४० हुन अधिक गोठे व चार जिल्हा परिषद शाळा असे अंशत: नुकसान होवुन सुमारे दिड कोटी हुन अधिक नुकसानी झाली आहे. तर १३२ विदयुत पोल व विदयुत वाहिन्या तुटुन २७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तौक्ते चक्रीवादळाचा फटका सर्वाधिक देवगड तालुक्यामध्ये झाला असून समुद्रकिनारी गावामध्ये जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यामधील पाचशेहुन अधिक घरांची पडझड झाली आहे. तर 40 हुन अधिक गोठयांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. विशेषत: करुन हिंदळे, मोर्वे, कुणकेश्वर, कातवण, वाडा, फणसे, पडवणे, पुरळ, हुर्शी, गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग, देवगड, जामसंडे आदी गावांना चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. पुरळ गावामधील प्रदीप सिताराम गावकर यांच्या घराचे पत्रे उडुन १ लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच सुरेश पुरळकर यांच्या शौचालयाचे पत्रे व वाशे उडुन १८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विष्णु हरी शिर्के यांच्या घरावरती झाड पडुन ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यशवंत शिर्के यांच्या घरावरील पत्रे उडुन ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पुरळ हुर्शी येथील श्रीधर मुळम यांचे राहत्या घराचे ७५ टक्केहुन अधिक नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे वाशे पुर्णपणे उडुन ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यामधील विविध गावांमधील ३२ पोल पडुन १८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर विदयुत वाहिन्या तुटुन ८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कलंबई केळयेवाडीमधील गेले तीन दिवस विदयुत पोल पडल्याने विज खंडित झाली आहे. विजयदुर्ग दशक्रोशीमध्येही अनेक गावांमध्ये विजेचे पोल पडुन गेले तीन दिवस ग्राहकांना विजेविना रहावे लागत आहे. तसेच पुरळ केळयेवाडी येथील खारबंधारा तुटुन नदीचे खारे पाणी पुर्णपणे शेत जमिनीमध्ये शिरले आहे. एैन येणा-या शेतीच्या हंगामामध्ये शेतामध्ये खारे पाणी गेल्यामुळे हजारो शेतजमिन नापिक बनली आहे. तसेच तालुक्यामधील अनेक गावांमध्ये खार बंधारे तुटुन हजारो हेक्टर शेतजमीन नापिक बनली आहे. तालुक्यामध्ये घरांची पडझड व इत्तर झालेल्या नुकसानीचे पंचनामे चालु असून आणखीन दोन दिवस हे पंचनामे चालुच राहणार आहेत.यामुळे देवगड तालुक्यातील नुकसानीचा आकडा आणखीन कोटयावधी रुपयांनी वाढणार आहे. तसेच मत्य्ये व्यावसायिकांच्या जाळीचे तसेच बोटींचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तौक्ते चक्रीवादळ हे गुजरातच्या दिशेने सरकले असले तरीही अदयापही मात्र पावसाचा जोर कमी झालेला नाही. यामुळे या अवकाळी पाऊस व चक्रीवादळाचा फटका अनेक गोष्टींवरती झाला आहे. )
देवगड तालुक्यामध्ये तौक्ते चक्री वादळामुळे सुमारे दीड कोटींचे नुकसान…
