*💫मालवण दि.१७-:* तौक्ते वादळासह आलेल्या उधाणाचा फटका आचरा गावाला जोरदार बसला आहे. पाणी वस्तीत शिरून काहींच्या घराच्या भिंती कोसळल्यात तर काहींच्या घरावर झाडे पडून डोक्यावरचे छप्परच गायब झाले आहे. कुणाचे पावसाळी बेगमी साठी साठवलेले धान्य ,भांडीकुंडी भिजून वाहून गेल्याने नुकसान झाले. यातच तौत्केचा फटका विद्यूत मंडळाला बसल्याने रविवार सकाळपासूनच विद्यूत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नेटवर्क ही गायब झाल्याने व्यथा कोणाला सांगणार. लाईट नाही तर पिण्याच्या पाण्याचे काय अशी स्थिती गाउडवाडी, जामडूल, पिरावाडी, हिर्लेवाडी,पारवाडी भागातील रहिवाशांची झाली आहे.या बाबतीत येथील युवकांकडून माजी सरपंच मंगेश टेमकर यांच्या पुढाकाराने पिण्याचे पाणी देण्याचे काम होती घेण्यात आले होते. ऐन उन्हाळ्यात तौत्केवादळ आणि समुद्राला आलेल्या भरतीची वेळ एक होऊन रविवारी झालेली पूरस्थिती निवळण्यास रविवार सायंकाळ झाली असली तरी सोमवारीही या वादळामुळे झालेली भयानकता दिसून येत होती. गाउडवाडी ख्रिचन वाडी येथील बस्तीन फर्नाडिस,इजाबेल फर्नाडिस यांच्या घरात उधाणाचे पाणी घुसल्याने त्यांच्या घरातील मातीच्या भिंती कोसळून घरातील अन्न धाण्य,भांडी कपडे भिजून वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. आहे.जामडूल येथील प्रमोद वाडेकर यांच्या पडवीवर आणि विहिरीवर माड मोडून पडला होता, बुधाजी पाटील यांच्या ही घरावर माड मोडून पडून नुकसान झाले होते. समिर पांगे यांच्या घरावर आंब्याचे झाड आणि विद्युत पोल मोडून पडला होता. पिरावाडी येथील बद्रूद्धीन मुजावर,विजय जोशी, लक्ष्मीकांत धुरी,सत्यवान पराडकर यांच्या घरावर माड आंब्याचे झाड पडून नुकसान झाले आहे. आचरा गाउडवाडी येथील अवधूत पांगे, अनंत पांगे यांच्या कलमबागेतील धरती सहा कलमे मोडून तर दहा कलमे उन्मळून पडल्याने आंबा बागेचे मोठे नुकसान झाले आहे.माजी उपसरपंचअनिल करंजे यांच्या दुकानासह घरात पाणी शिरले होते, परसात उभ्या गाड्या ही पाण्याखाली गेल्या होत्या. चंद्रकांत गांवकर तानाजी पांगे यांच्या दुकानातही पाणी शिरले होते. अनेकांनी इमू मुजावर, जगदीश पांगे यांच्या घराचा आसरा घेतला होता. काहींना रविवारी रात्री निलेश सरजोशी यांच्या रिसॉर्ट ला हलविण्यात आले होते. आचरा गाउडवाडी, हिर्ले,जामडूल, पिरावाडी या भागातील सुमारे ५६च्या वर ग्रामस्थांसह आचरे गावातील अनेकांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.याबाबतच्या नुकसानीचा पंचनामा पुर्ण झाला नसल्याने नुकसानीचा आकडा कळू शकला नाही. पुरसस्थिती भागात लाईट नसल्याने आणि विहीरीमध्ये खारे पाणी शिरल्याने पिण्याच्या पाण्याची गरज निर्माण झाली होती. याबाबत माजी सरपंच मंगेश टेमकर यांच्या सहकार्याने क्रूष्णा तारकर,रोहित भिरवंडेकर,सिद्धांत हजारे, विनय ठाकूर आदी सह युवकांनी पिण्याचे पाणी जामडूल भागात पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. आचरा हिर्लेवाडी येथे निळकंठ गोपाळ पेडणेकर यांच्या घरावर आंब्याची फांदी पडली तर पांडूरंग वायंगणकर यांचा माड कोसळला, तौत्के वादळाचा फटका विद्यूत मंडळालाही बसला असून अनेक ठिकाणी तारांवर झाडे पडून तारा तुटून, पोल मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
तौक्ते वादळासह आलेल्या उधाणाचा आचरा गावाला फटका…
