आशिष सुभेदार यांचा आरोप:
धुळ, खोदाईमुळे नागरिक हैराण..
सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा, न्यू खासगीलवाडा ते जेल नजीकच्या सर्व परिसरात नगरपालिकेकडून सुरू असलेले नळपाणी पाइपलाइन टाकण्याचे काम निकृष्ट पद्धतीने तसेच अगदी धीम्या गतीने सुरू असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व प्रभागात खोदाई करून ठेवण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अपघातासारखे प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे तातडीने हे काम पूर्ण करावे अन्यथा प्रशासनाला घेराव घालत जाब विचारला जाईल असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
सावंतवाडी शहरात सगळीकडे रस्ते खोदाई करून नवीन नळपाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या खोदाईंमुळे शहरात ठिकठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. खसकिलवाडा, न्यू खासकिलवाडा जेल नजीकचा संपूर्ण भाग धुळीने माखला आहे. या भागात जोरात सध्या खोदाईचे काम सुरू असून यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून सुरू असलेले पाइपलाइन टाकण्याचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. यामुळे खासकीलवाडा परिसर देखील धुळ पसरली असून ज्येष्ट नागरिक यांना श्वसनाचे त्रास उद्भवू लागले आहेत. पाइपलाइन टाळण्यासाठी जी यंत्रणा वापरली जात आहे ती निकृष्ट पद्धतीची आहे. अधिकारी, अभियंता यांनी हे काम सुरू असताना प्रत्यक्ष साईटवर असणे गरजेचे असताना कोणीही अधिकारी या ठिकाणी फिरकत नाही. त्यामुळे नागरिकांना यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. रस्ते खोदाई साठी खासकिलवाडा परिसरातील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. एक भाग खोदाई करिता घ्यावा तेवढाच पट्टा वाहतुकीस बंद ठेवला जावा अशी सूचना सुभेदार यांनी केली आहे. शहरात निकृष्ट पद्धतीने पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तातडीने हे काम पूर्ण करून डांबरीकरण केले जावे, धुळीच्या त्रासातून नागरिकांना मुक्त करावी अन्यथा प्रशासनाला उबाठा सेनेच्या वतीने घेराव घालण्यात येईल असा इशारा तालुकाप्रमुख सुभेदार यांनी दिला आहे.
