राणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण:माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांचे उद्या जल्लोषी स्वागत..
⚡कणकवली ता.०३-: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कोकणचा बुलंद आवाज खासदार नारायण राणे नगरपरिषद निवडणूकानंतर पहिल्यांदाच उद्या रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. त्यांच्या समवेत पालकमंत्री नितेश राणे, शिवसेना आ. निलेश राणे असे एकत्रित” राणे कुटुंबिय ” राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राणे समर्थक कार्यकर्त्यांकडून स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपा पदाधिका-यांच्या स्टेट्सवर” मी राणे समर्थक ” असे लिहत खा. नारायण राणे यांचा फोटो असलेले पोस्टर दिसत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण असल्याचे दिसत आहे.
सिंधुदुर्गात पुन्हा एकदा ब-याच वर्षानंतर राणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये 2005 सालातील शिवसेना पक्ष सोडल्यानंतर जी भावना खा. नारायण राणे यांच्याबद्दल झाली होती. तीच ठिणगी या नगरपरिषद निवडणूकानंतर पुन्हा एकदा पडल्याचे चित्र निर्माण होत आहे. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेलं नेतृत्व म्हणजेच खा. नारायण राणे …! या सिंधुदुर्ग जिल्ह्यात खा. नारायण राणेंच्या नेतृत्वात तयार झालेला कार्यकर्ता तेवढाच आक्रमक आणि कणखर आहे. कुठल्याही महाशक्तीला टक्कर देण्याची हिंमत आणि धाडस या राणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणूकीत घडलेल्या पार्श्वभूमीवर एक संतापाची लाट जिल्ह्यातील राणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आहे.
त्यामुळे नगरपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर राणे कुटुंबिय सिंधुदुर्गात येत असल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील भाजप मधील विविध पदांवर कार्यरत असलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा वॉट्सअप स्टेटस” मी राणे समर्थक”, एकच नारायण राणे … जय नारायण … आमची ओळख राणे कुटुंबिय असे विविध शब्दप्रयोग करत समर्थन खा. नारायण राणेंना मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील घडामोडीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. राणे समर्थक कार्यकर्त्यांकडून खा. नारायण राण यांच्या बांदा ते कणकवली अशा स्वागत रॅलीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कणकवली उपजिल्हा रुग्णालय समोरील पटांगणावर खा. नारायण राणे यांची सभा होणार आहे. या सभेत खा. नारायण राणे काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
