⚡वेंगुर्ला ता.०३-: ज्ञानज्योती –
महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी जी ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत, त्यामुळे आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत.
आई – वडिलांची शिकवण जोपासून आज आपण उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. आज महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहेच, पण आपल्या वेंगुर्ला या सुसंस्कृत शहरातील महिला भगिनी नगरपालिकेवर प्रतिनिधित्व करताहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. महिलांनी आज सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन महिला सक्षमीकरण, नवीन उद्योग – व्यवसाय यांची कास धरून चांगले कार्य करावे, असे प्रतिपादन वेंगुर्ला येथील महिला उद्योजिका तथा महिला काथ्या औद्योगिक संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांनी आज शनिवारी सायंकाळी (3 जानेवारी) वेंगुर्ला येथे बोलताना केले.
सावित्रीबाई फुले यांच्या
जयंतीचे औचित्य साधून
वेंगुर्ला येथील महिला उद्योजिका तथा महिला काथ्या औद्योगिक संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांच्यामार्फत
वेंगुर्ला नगरपरिषद नवनिर्वाचित 10 महिला नगरसेविकांचा महिला काथ्या औद्योगिक संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला, यावेळी प्रज्ञा परब बोलत होत्या. सर्वप्रथम उद्योजिका प्रज्ञा परब यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, आकांक्षा परब, शीतल आंगचेकर, लीना म्हापणकर, सुमन निकम, गौरी मराठे, समिधा रेडकर, गौरी माईणकर, रिया केरकर, काजल कुबल इत्यादी 10 नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वेंगुर्ला तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका ऍड. सुषमा प्रभूखानोलकर
बोलताना म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी
महिलांना सन्मान, शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून दिला.महात्मा. ज्योतीराव फुले यांनी त्यांची हुशारीचा उपयोग समाजासाठी होईल, यादृष्टीने महीलांना शिक्षण देण्याचा वसा पुढे नेला. त्यामुळे पुढे जाऊन सावित्रीबाई फुले यांनी महिलासाठी केलेले कार्य निश्चितच आजच्या पिढीला प्रोत्साहित करणारे व ज्ञानाचा वारसा अधिक पुढे नेणारा आहे.त्यामुळे त्यांचे आदर्श जोपासणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.तसेच शितल आंगचेकर यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांस प्रविणा खानोलकर, सुप्रिया हळदणकर, नीलम कामत, पूजा परब, मानसी परब, अंजली धुरी, निधी शिरोडकर, मंझिल शेख, प्रियांका कोयंडे, स्वप्ना धुरी, ऋतुजा शेटकर, साधना कोणेकर आदी उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमांस शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सावित्रीबाई फुले यांचेआदर्श जोपासणे हे आपले कर्तव्य-: प्रज्ञा परब…
