डॉ. विनयकुमार आवटे:कणकवली कॉलेज मार्फत हळवल गावात कॅन्सर मुक्त गाव आणि विषमुक्त सेंद्रिय शेती या विषयावर चर्चासत्र संपन्न..
⚡कणकवली ता.०२-: कॅन्सर होण्यासाठी अन्नपद्धती व जीवनशैली कारणीभूत असते, जर कॅन्सर पासून स्वतःला वाचवायचे असेल तर अन्नपद्धती व जीवनशैलीमध्ये सुधार करणे गरजेचे. असे मत डॉ. विनयकुमार आवटे, आयुष मंत्रालय भारत सरकार सल्लागार यांनी व्यक्त केले. कणकवली कॉलेज, कणकवली, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व हळवल ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत हळवल येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी व्यासपीठावर श्रीम. हेमा शर्मा, ‘आयुष मॅक्झिन’ संपादक,भारत सरकार, हळवल ग्रामपंचायत सरपंच श्रीम. वंदना चव्हाण, उपसरपंच प्रभाकर राणे, सदस्य रोहित राणे, ग्रामपंचायत अधिकारी वर्षा कदम, ग्राममहसूल अधिकारी श्री. राकेश इनकर, प्र. प्राचार्य युवराज महालिंगे, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्रा. डॉ. किरण जगताप, प्रा. सागर गावडे, प्रा. विद्या मारकड, प्रा. पूजा मुंज, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक उपस्थित होते.
ग्रामस्थ व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना कॅन्सर होण्यास कारणीभूत घटक, कॅन्सर बाबतचे समज गैरसमज, कॅन्सर रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, कॅन्सर उपचार पद्धती अशा विविध बाबींचे सखोल विश्लेषण डॉ. विनयकुमार आवटे यांनी केले. हेमा शर्मा यांनीही विविध प्रश्नांच्या मार्फत ग्रामस्थ व स्वयंसेवक यांच्यामध्ये कॅन्सर आणि सेंद्रिय शेती याबाबत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रम प्रसंगी सरपंच श्रीम. वंदना चव्हाण आणि उपसरपंच श्री. प्रभाकर राणे यांनी कणकवली कॉलेज मार्फत आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्य युवराज महालिंगे म्हणाले की, कॅन्सरचे प्रमाण सध्या वाढत आहे पण लोकांनी कॅन्सरला घाबरण्याऐवजी त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनीही ग्रामस्थ व स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत डॉ. सुरेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन स्वयंसेविका प्रेरणा जाधव व प्रणाली पवार यांनी केले. यावेळी 100 स्वयंसेवक, तसेच विविध महिला बचत गटांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित नागरिकांना शरीराची प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या औषधांचे वाटप करण्यात आले. प्रा. डॉ. किरण जगताप यांनी आभार मानले.
