⚡मालवण ता.३१-:
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन जिल्हा ग्रंथालय संघांचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सिंधुदुर्ग वाचन मंदिर, तारकर्ली आणि अखिल तारकर्ली ग्राम विकास मंडळ, मुंबई तारकर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लू हेवन रिसॉर्ट, तारकर्ली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनात प्रथम सत्रात सकाळी ९.३० ते १० वा. श्री महापुरूष मंदिर तारकर्ली ते ब्लू हेवन रिसॉर्ट तारकर्ली अशी ग्रंथ दिंडी काढण्यात येईल, सकाळी १० ते १०.३० वा. प्रतिनिधी नोंदणी, परिचय, अल्पोपहार, सकाळी १०.३० ते दुपारी १ वा. अधिवेशन उद्घाटन सोहळा होणार असून यावेळी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप जनार्दन ढवळ व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, तारकर्ली सरपंच सौ. मृणाली मयेकर, स्वागताध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग वाचन मंदिर तारकर्लीच्या अध्यक्ष कांचन खराडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
व्दितीय सत्रामध्ये दुपारी २ ते ३.३० वा. ग्रंथालय कर्मचारी व पदाधिकारी आणि डॉ. दत्ता सामंत न्यु इंग्लिश स्कुल देवबाग यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. यामध्ये दशावतार, नाटय अभिवाचन, प्रहसन व समुहनृत्ये सादर होतील. दुपारी ३.३० ते ४.३० वा. होणाऱ्या खुल्या अधिवेशनामध्ये ग्रंथालयांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. खुल्या अधिवेशनाचे प्रमुख मार्गदर्शक सचिन हजारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सिंधुदुर्ग हे आहेत. अधिवेशनाची सांगता पसायदानाने होईल.
या अधिवेशनाला सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघांचे अध्यक्ष श्री. मंगेश मसके यांनी केले आहे.
