बांबर्डेत ओंकारकडून शेती, पॉवर टिलरचे नुकसान…

दत्ताराम देसाई यांची माहिती, हत्ती पकड मोहीम राबवण्याची मागणी..

दोडामार्ग, ता.२३:-:
बांबर्डे (हेवाळे – घाटीवडे बांबर्डे ) येथील ऋषभ देसाई यांच्या शेती बागायतीचे आणि पॉवर टिलरचे नुकसान ओंकार हत्तीकडून करण्यात आल्याची माहिती स्थानिक शेतकरी दत्ताराम देसाई यांनी दिली.
वनविभागाच्या दुर्लक्षाविरोधात शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत असून, बांबर्डेत ओंकारकडून शेती बागायतीचे नुकसान होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
हेवाळे, घाटीवडे बांबर्डे परिसरात मागील २३ वर्षांपासून हत्तींचा उपद्रव सुरू असून, याकडे वनविभाग व शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांनी अनेक वेळा उपोषण, आंदोलन व निवेदने देऊनही शासनाकडून आजपर्यंत कोणतीही ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.
हत्तींच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेती उद्ध्वस्त होत असून शेतकरी आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटात सापडला आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की शेतकऱ्यांना आता जगण्याचा मार्गच उरलेला नाही . ही अवस्था शासनाच्या निष्क्रियतेचे उदाहरण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

…अन्यथा जन आक्रोश आंदोलन उभारू

शासनाने हत्ती प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ हत्ती पकड मोहीम राबवावी आणि त्यांना त्यांच्या मूळ नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडावे, अशी मागणी शेतकरी करत असून शेतकऱ्यांच्या पिकांची जबाबदारी वनविभागाने घ्यावी ; अन्यथा आम्हाला वन विभागाविरोधात जन आक्रोश आंदोलन उभारावे लागेल,असा इशारा दत्ताराम देसाई यांनी दिला आहे.
बांबर्डे: येथील ऋषभ देसाई यांची शेती बागायत व पॉवर टिलरचे झालेले नुकसान.

You cannot copy content of this page