शहर संघटक निशांत तोरसकर यांचा पदाचा राजीनामा..
⚡सावंतवाडी, ता..२३-:
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सावंतवाडी शहर संघटक निशांत चिंतामणी तोरसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी शिवसेना (उबाठा) सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुखांकडे सादर केले आहे.
पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, गेल्या एक वर्षाच्या कालावधीत सावंतवाडी शहरात पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. या प्रयत्नांना यश येत सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षांसह २१ जागांवर पक्षाला यश मिळाले. मात्र निवडणुकीदरम्यान उमेदवारीच्या अनामत रकमेबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्व उमेदवार पराभूत झाले, याची जबाबदारी नैतिकतेच्या भूमिकेतून स्वीकारत आपण शहर संघटक पदाचा राजीनामा देत असल्याचे तोरसकर यांनी स्पष्ट केले आहे.
या संपूर्ण प्रकरणासाठी कोणालाही दोष न देता, स्वतः जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले असून, तो राजीनामा मान्य करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
या राजीनाम्यामुळे सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
