व्यापारी महासंघ अध्यक्ष प्रसाद पारकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
*💫मालवण दि.१३-:* कोल्हापूर जिल्ह्यात येत्या शनिवारी मध्यरात्री पासून संपूर्ण टाळेबंदी लागण्याचे वृत्त असून याच दरम्यान सिंधुदुर्गातील लॉकडाऊन उठणार असल्याने यावेळी कोल्हापूरवरून माल येणे बंद झाल्यास जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई व भाव वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांशी संपर्क करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यास भाग पाडावे, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरोना प्रसार रोखण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात येत्या शनिवारी मध्यरात्री पासून संपुर्ण टाळेबंदी घोषित होणार असल्याचे वृत्त आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वाणसामानादी सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी पुर्णपणे कोल्हापूर बाजारपेठेवरच अवलंबून आहे. आपल्या जिल्ह्यातील संपुर्ण टाळेबंदी येत्या १५ तारखे पासुन शिथिल होणार आहे आणि नेमक्या त्याच वेळी जर कोल्हापूरहून माल येणे बंद झाले तर सिंधुदुर्गात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे. त्यातून अपरिहार्य अशी भाववाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आधीच कोरोनाने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या हालात अधिकच भर पडून त्यांच्या रोषाला स्थानिक शासन- प्रशासनाला सामोरे जावे लागणार आहे. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी संपर्क करून आपल्या जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी आवश्यकत्या उपाययोजना करण्यास भाग पाडावे, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांनी निवेदनात म्हटले आहे. *जिल्हाधिकारी यांचेही वेधले लक्ष* दरम्यान, व्यापारी महासंघाने या मागणीचे निवेदन सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे दिल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होऊ देणार नाही, असे काही होत असल्यास आपल्याशी संपर्क करावा, आवश्यक उपाययोजना तात्काळ करून सर्व मालाचा पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली जाईल, असे व्यापाऱ्यांना आश्वस्त केले आहे.
