कणकवलीत युवती मृत्यू प्रकरणी परस्पर गुन्हे दाखल…?

50 पेक्षा जास्त लोकांवर झाले गुन्हा दाखल:गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून कमालीची गुप्तता..

⚡कणकवली ता.१५-: तालुक्यातील युवतीच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने खासगी रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धक्काबुकी करत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी मृत युवतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन डॉक्टरांवर, तर रुग्णालयाचे संचालक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४० ते ५० जणांविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परस्पर गुन्हे दाखल झाल्याने कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,मुलीच्या वरच्या भागात असलेली गाठ काढण्यासाठी शनिवारी कणकवलीतील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिची प्रकृती खालावल्याने तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

युवतीच्या मृत्यूनंतर रविवारी संतप्त ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह रुग्णालयाच्या दारासमोर ठेवत ठिय्या आंदोलन केले. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा नाहक बळी गेला, असा आरोप करीत जमावाने रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी धक्काबुकी केली. याचदरम्यान रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली असून सुमारे चार तास रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणातील तपासाबाबत पोलिसांकडून गुप्तता पाळली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. युवतीचा मृत्यू आणि रुग्णालय तोडफोडीप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page