कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग…

त्या’ जिल्हास्तरीय नेत्याच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष.

⚡कणकवली ता.०२-:
कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही महिने शिल्लक असतानाच, शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील राजकारणाचे समीकरण बदलले असताना आता पुन्हा एकदा कणकवलीतील घडामोडींवर जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर एका जिल्हास्तरीय नेत्याने आपल्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. या चर्चेत काहींनी सत्ताधारी पक्षासोबत जाण्याचे, तर काहींनी जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे या नेत्याची आगामी भूमिका नेमकी काय असेल, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या नेत्याला सध्या असलेल्या पक्षासोबतच दुसऱ्या सत्ताधारी पक्षाकडूनही नगराध्यक्ष पदाची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे. संभाव्य “कणकवली शहर विकास आघाडी”चे नेतृत्व स्वीकारायचे की विद्यमान पक्षातूनच मैदानात उतरण्याचा निर्णय घ्यायचा—या अनुषंगानेही या बैठकीत मते घेतल्याचे समजते.

कार्यकर्त्यांनी “आपण जो निर्णय घ्याल, त्यास आम्ही सोबत आहोत,” अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, या जिल्हास्तरीय नेत्याच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेला काही दिवसांपासून उधाण आले असले, तरी त्या संदर्भात कोणताही अधिकृत “संदेश” अद्याप दिलेला नाही. त्यामुळे या घडामोडींचा ताण जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर जाणवतो आहे.

या नेत्याच्या भोवती निर्माण झालेले राजकीय वलय आणि राज्यस्तरीय नेतृत्वाशी असलेले संबंध पाहता, सत्ताधारी पक्षाकडून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले जाते. मात्र, पक्षातील काही माजी लोकप्रतिनिधींचा विरोध असल्याचीही चर्चा आहे.

सत्ताधारी पक्षाकडून अद्याप नगराध्यक्ष पदासाठी हिरवा कंदील मिळालेला नसल्याचे समजते. त्यामुळे हा विरोध मान्य केला जाणार की वरिष्ट पातळीवरील समीकरणांमुळे त्यांना प्रवेश मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्या असलेल्या पक्षाकडून अपेक्षित पाठबळ न मिळाल्याने या नेत्याच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचेही बोलले जाते. विधानसभा निवडणुकीतील अनुभव आणि व्यक्त झालेली नाराजी पाहता, आता हा नेता ‘जैसे थे’ स्थितीतच राहणार की धनुष्य हाती घेऊन नव्या झेंड्याखाली लढणार, याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूणच, या नेत्याच्या निर्णायक भूमिकेनंतर कणकवलीतील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीत ‘त्या’ नेत्याचा निर्णयच कणकवलीच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page