काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी:अभियंत्यांना निवेदन सादर..
⚡मालवण ता.३१-:
वीज महावितरण कंपनीच्या मालवण उपविभाग कार्यालयाच्या आवारातील सुरू असलेले वीज बिल भरणा केंद्र हे हे उपविभाग स्तरावर कॅशिअर (रोखपाल) हे पद नसल्यामुळे १ नोव्हेंबर पासून बंद करण्यात येत असल्याने याबाबत आज राष्ट्रीय काँग्रेस व ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी वीज कार्यालयात धडक देत वीज अभियंता श्री. सचिन म्हेत्रे यांना जाब विचारला. सदर बिल भरणा केंद्र बंद केल्याने सामान्य वीज ग्राहकांना बिल भरताना अनेक अडचणी येणार असून वीज कंपनीने ग्राहकांना वेठीस धरू नये, वीज भरणा करण्यासाठी रोखपाल पदी पर्यायी व्यक्तीची नियुक्ती करून ग्राहकांना सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी वीज अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश अंधारी, आपा चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, देवानंद लुडबे, ह्यूमन राईट्स असोसिशन फॉर प्रोटेक्शन जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, तालुका उपाध्यक्ष महेश मयेकर, महिला संपर्क प्रमुख अश्विनी गावठे, मिथिलेश मिठबावकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वीज बिल भरणा केंद्र बंद करण्यात येत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. महावितरणच्या या मनमानी कारभारा बाबत ग्राहकांमध्ये रोष निर्माण होत आहे. वाढीव बिल अथवा कोणतीही समस्या आल्यावर ग्राहक हा याच ठिकाणी कार्यालयात अधिकारी यांस भेटून ते तो कमी करून घेतो आणि इतर समस्यावर तोडगा काढतो. परंतु हे कार्यालय मधील वीज बिल केंद्र बंद केल्यास नागरिकांना मनस्ताप होणार आहे. पर्यायी ऑनलाईन सुविधा अपुऱ्या नेटवर्क मुळे कोलमडत असताना आता नागरिकांना वेठीस धरण्याचं कामं यां महावितरण कंपनी कडून होत आहे, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ग्राहक कायद्या नुसार ही सुविधा ग्राहकाला कार्यलयात देखील देण्याची नियमावली असताना महावितरण ची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अपुरे कर्मचारी ही कारणे आम्हाला सांगू नका, नागरी सुविधा द्या आणि विज बिल भरणा केंद्र चालू ठेवा असे यावेळी अरविंद मोंडकर यांनी सांगितले. तर सामान्य नागरिकांना होणारा त्रास खपवून घेणार नाही, असे आप्पा चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी वीज अभियंता सचिन म्हेत्रे यांनी वीज बिल भरणासाठी रोखपाल हे पदच नसल्याने हे केंद्र बंद करावे लागत आहे, मात्र तरीही ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आम्ही या पदासाठी पर्यायी अतिरिक्त कर्मचारी मिळावा, अशी मागणी वरिष्ठ पातळीवर केली आहे, येत्या दोन दिवसात याबाबत उपाययोजना करण्यात येईल असे सांगितले.
